Presidential election २०२२ |
Presidential election २०२२ | 
देश

द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल : पंतप्रधान, शहा, योगींसह मित्रपक्ष नेतेही हजर

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आघाडीच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज राज्यसभा सचिवालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा येत्या सोमवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संयुक्त जनता दल, बीजू जनता दल व वायएसआर कॉंग्रेसने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे चांगलेच जड आहे. मुर्मू या देशाच्या १६ व्या, दुसऱ्या महिला व आदिवासी समाजातील पहिल्याच राष्ट्रपती ठरणार आहेत.

मुर्मू यांनी राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी यांच्याकडे अर्ज दाखल केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुर्मू यांच्या अर्जाचे पहिले समर्थक व मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. याशिवाय भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, प्रमोद सावतं, हेमंता बिस्वा शर्मा, पुष्कर धामी हे भाजप मुख्यमंत्री, संयुक्त जनता दल, बीजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस या समर्थक पक्षांचे प्रतीनिधीही हजर होते.

मुर्मू या कालच दिल्लीत पोहोचल्या. त्यांनी पंतप्रधान मोदी, शहा, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आदींची यांची भेट घेतली. या नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन मुर्मू यांचे स्वागत व अभिनंदन केले. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत जम्मू व काश्मीर वगळता सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आमदार मतदान करू शकतील. जम्मू-काश्मीर व लद्दाख या केंद्रशासित प्रदेशांत सध्या विधानसभा अस्तित्वात नाही. त्यामुळे डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यासह तेथील फक्त लोकसभेचे खासदार मतदान करू शकतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे संचालन राज्यसभा सचिवालय करते. अर्ज भरताना ५० प्रस्तावक व ५० अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्याअसलेले उमेदवारी उमेदवारी अर्जांचे चार संच अर्ज दाखल करण्यात आले. यासंदर्भात भाजप मुख्यालयात गेले काही दिवस सुरू असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेवर कालच अखेरचा हात फिरवण्यात आला. मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी जे.पी. नड्डा, राजनाथसिंह व प्रमुख भाजप नेते लवकरच देशाच्या दौऱ्यावर जातील व भाजप तसेच मित्रपक्षांच्या नेत्यांना मुर्मू यांच्या विजयासाठी साथ देण्याचे अधिकृतरीत्या आवाहन करतील. स्वतः द्रौपदी मुर्मू यादेखील विविध राज्यांचा दौरा करतील.

पंतप्रधान मोदी यांनी आज नवीन संसद भवनाच्या कामाचाही आढावा घेतला. नवीन संसद भवनाचे काम रात्रीचा दिवस करून विद्युतवेगाने सुरू आहे. टाटा उद्योगसमूहातर्फे बांधण्यात येणाऱया या संसद भवनाचे बांधकाम कोरोनाकाळातही अखंड काम सुरू होते. या वर्षीचेच (२०२२) हिवाळी अधिवेशन नवीन संसद भवनातच घेणार असा विश्वास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. या इमारतीचा त्रिकोणी आकार आता बाहेरूनही स्पष्ट दिसू लागला आहे. सर्वप्रथम लोकसभा-राज्यसभा व संविधान सभागृहाच्या कामाची पूर्तता करण्यास सरकारचे प्राधान्य आहे. नवीन संसदेच्या आत जे लाकडाचे काम होणार आहे त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अस्सल सागवानाचा वापर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT