Droupadi Murmu protocol controversy : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रोटोकॉलचे पालन न केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जींवर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालला गेल्या होत्या. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने अचानक या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले. शिवाय राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या सरकारमधील कोणीही मंत्री उपस्थित नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपतींना अपमान ममता यांनी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
स्वत: राष्ट्रपतींनी देखील याबाबतची खंत बोलून दाखवली आहे. मात्र, आता या वादावर ममता बॅनर्जींनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय भाजपकडून राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्य सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे आरोप फेटाळून लावला आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधित कागदपत्रे शेअर केली आहेत. यामध्ये राष्ट्रपती सचिवालयाने मंजूर केलेल्या अधिकृत कार्यक्रमसूचीमध्ये मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्र्यांना उपस्थित राहण्याची कोणतीही अट नव्हती. तसंच हा कार्यक्रम 'आंतरराष्ट्रीय संथाल परिषद' या खाजगी संस्थेने आयोजित केल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.
तसंच राष्ट्रपतींच्या स्वागत आणि निरोपासाठी राष्ट्रपती सचिवालयाने मंजूर केलेल्या योजनेनुसारच सिलिगुडीचे महापौर, दार्जिलिंगचे जिल्हाधिकारी आणि सिलिगुडीचे पोलीस आयुक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाची आयोजकांकडून पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही, असं सिलिगुडी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रपती सचिवालयाला आधीच कळवलं होतं.
त्याची माहिती फोनवरूनही देण्यात आली होती. राष्ट्रपती सचिवालयाचे पाहणी पथक 5 मार्च रोजी कार्यक्रमस्थळी पोहोचले असताना त्यांनाही व्यवस्थेतील त्रुटींची माहिती देण्यात आली होती, असं ममता स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व प्रकरणावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तसेच आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही घटना लज्जास्पद आणि अभूतपूर्व आहे. आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात मोठी खंत असून दुःख झालं आहे. तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात मोदींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.