Violent incident at Lakhimpur Kheri Sarkarnama
देश

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले; आठ जणांचा मृत्यू : शेतकरी संघटनांचा आरोप

शेतकऱ्यांच्या आंदोलनास यूपीत हिंसक वळण

सरकारनामा ब्यूरो

लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. (Eight people were killed when a car hit a protesting farmer)

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आज लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

यूपीतील लखीमपूर खेरी येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आले होते. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले, ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात चार शेतकरी आणि चार भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शेतकऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली चिरडणे हे अत्यंत अमानवी आणि क्रूर कृत्य आहे. उत्तर प्रदेश यापुढे अशा अहंकारी भाजप नेत्यांची जोरजबरदस्ती सहन करणार नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर यूपीमध्ये भाजप नेते गाडीतून फिरू शकणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT