नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गटाच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (२० जुलै) सुनावणी होणार आहे. आमदारांना फोडल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेनेचे (Shivsena) खासदार फोडाफोडीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. अशात मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे.
त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांची भेट घेतली. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची वाट धरल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांसोबतच रात्रीचे जेवण घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदारही उपस्थित होते. त्यामुळे हे 12 खासदारही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
दिल्लीत दाखल होताच त्यांनी आधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या वेळी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वगळून दिल्लीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील नव्या मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयात उद्या 20 जुलै रोजी शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशाचे लक्ष या सुनवणीकडे लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा गेल्या 15 दिवसांतला हा दुसरा दौरा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या आठवड्यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटण्यासाठी गेले होते.त्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच एकटेच दिल्लीत गेले आहेत.
सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे सरकाराचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष मिळून जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करत महाविकास अघडीतून बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही बाहेर पडले, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.