Milind Narvekar News, Eknath Shinde News, Shivsena Political Crisis News
Milind Narvekar News, Eknath Shinde News, Shivsena Political Crisis News Sarkarnama
देश

नार्वेकरांपुढे शिवसेना अन् ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद वाचविण्याचे आव्हान : संकटमोचक ठरणार?

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेसाठी (Shivsena) एसंकटमोचक ठरण्याची शक्यता आहे. मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जुने ऋणानुंबध आहेत. त्यामुळेच शिंदे यांचे मन वळविण्याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नार्वेकरांसोबत धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले शिंदे यांचे जुने मित्र रवींद्र फाटक हे देखील सुरतमध्ये आहेत. (Uddhav Thackeray latest News)

गेल्या जवळपास ३० वर्षांपासून नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत आहेत. ठाकरेंनी आखलेली रणनिती यशस्वीपणे तडीस नेणे ही जबाबदारी ते मागील अनेक वर्षांपासून पार पाडत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नार्वेकरांना रणनितीपासून दूर ठेवले असल्याचे दिसून येत होते. याची फळे पक्षाला भोगावी लागली. (Eknath Shinde news in marathi)

अगदी छत्रपती संभाजीराजे यांना दुखावण्यापासून शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सर्वच ठिकाणी नियोजन फसल्याचे स्पष्ट झाले. दोन राऊत, एक परब आणि एक देसाई यांच्या फसलेल्या रणनितीमुळे शिवसेना आणखीनच अडचणीत आली. मात्र, आता शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी नार्वेकर यांना पाठवून उद्धव ठाकरे यांनी वेगळी खेळी खेळल्याचे स्पष्ट होते आहे. शिंदे आणि नार्वेकर यांचे जुने ऋणानुबंध हे देखील त्याला एक महत्त्वाचे कारण आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि त्यावर काय उपाय काढला जाऊ शकतो, मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना आणखी महत्त्व दिले जाऊ शकते का, यावरही नार्वेकर-शिंदेमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मातोश्रीकडून एखादी वेगळी ऑफर देखील नार्वेकरांनी शिंदेंसमोर दिली जावू शकते. कदाचित काही अपक्ष आमदारांऐवजी शिंदे समर्थकांना मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन असू शकतो.

एकनाथ शिंदे यांना आता अनेक आमदारांचा पाठिंबा आहे, असे प्रथमदर्शनी वाटत असले, तरीही भविष्यात या सर्व आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मुळात निवडणुकीला सामोरे जाण्याची आणि शिवसेनेतून बाहेर पडून नव्याने सुरुवात करण्याची किती जणांची तयारी आहे? निवडून येण्याची किती जणांची क्षमता आहे? अशी सद्यस्थितीची जाणीव आमदारांना करून देण्यात येऊ शकते. भाजपाची ही खेळी नेमकी काय आहे आणि त्यातून शिवसेना आमदारांच्या हातात काहीच कसे पडणार नाही, याबाबतही नार्वेकर यांनी आमदारांना समजावून सांगितले असे शकते.

शिंदे यांची कोंडी करण्यासाठी काही आमदारांना पुन्हा एकदा मातोश्रीकडे वळविण्याचे प्रयत्न देखील या भेटीदरम्यान होण्याची शक्यता टाळता येत नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यापैकी अनेकांनी नार्वेकरांवर निशाणा साधत सेनेला जय महाराष्ट्र केला होता. मात्र, यंदा प्रथमच शिंदे यांनी नार्वेकर यांच्यावर खापर न फोडता थेट नेतृत्वावरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच नार्वेकर हे शूटर म्हणून समोर आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT