Narendra Modi rally in Varanasi.

 

Sarkarnama

देश

तोपर्यंत आमचा संबंध नाही! निवडणूक आयोगाने झटकले हात

पुढील दोन महिन्यांत देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पुढील दोन महिन्यांत देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होत आहेत. त्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यातच कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) या निवडणुका नियोजित वेळेत होतील, असे जाहीर केले आहे. याचवेळी प्रचाराला होत असलेली गर्दी आणि त्यामुळे होणारा कोरोना प्रसार या मुद्द्यावर आयोगाने हात झटकले आहेत.

निवडणूक आयोगाने आज उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सत्ताधारी भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे न ढकलण्याची विनंती केली आहे. प्रचारसभांमध्ये होणाऱ्या कोरोना विषयक नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर पक्षांनी हे नियम पाळण्याची तयारी दर्शवली आहे.

राज्यात आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. प्रचारसभांना मोठी गर्दी दिसून येत असल्याने कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांच्या मोठ्या सभा होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती पंतप्रधान मोदी व केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. याबाबत विचारणा केली असता चंद्रा म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आमची जबाबदारी सुरू होते. आचारसंहिता जाहीर होईपर्यंत ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे.

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधानसभा निवडणुका घेण्याची ठाम भूमिका घेतली आहे. विधानसभेची मुदत संपण्याआधी संबंधित राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्याचे घटनात्मक बंधन आयोगावर आहे. गोवा विधानसभेची मुदत 15 मार्च, मणिपूर विधानसभेची 19 मार्च आणि उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत 14 मे रोजी संपत आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आयोगाने ठरवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT