election commission barred dmk a raja for 48 hours from campaigning
election commission barred dmk a raja for 48 hours from campaigning  
देश

एक चूक भोवली..निवडणूक आयोगाचा अखेर राजांना दणका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या टिप्पणीमुळे जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विविध पक्षांच्या नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर निवडणूक आयोगाने या प्रकरणी द्रमुकचे नेते ए.राजा यांना मोठा दणका  दिला आहे. 

राजांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे खुलासा मागितली होता. आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याबद्दल राजांनी केलेले विधान असभ्य असून, मातृत्वाचा अपमान करणारे आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याने आयोगाने राजांना 48 तास प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

राजांकडून आधीच माफीनामा 

मागील आठवड्यात प्रचारादरम्यान ए. राजा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल जाहीर माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, माझ्या विधानामुळे मुख्यमंत्र्यांना खूप दुःख झाले, याबद्दल मला खेद वाटतो. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याने मला पश्‍चात्ताप होतोय. त्यांना खरेच वेदना झाल्या असतील तर राजकारण बाजूला ठेवून मी त्यांची माफी मागतो. माफी मागण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही. दोन्ही नेत्यांच्या खासगी आयुष्याची तुलना करण्याचा माझा उद्देश नव्हता, तर भाषणात त्यांच्या सार्वजनिक जीवनाची तुलना मी केली होती. 

पलानीस्वामींना बसला होता धक्का 

राजा यांच्या टिकेमुळे पलानीस्वामी यांना मोठा धक्का बसला होता. जाहीर कार्यक्रमात त्यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदका दाबून बोलताना ते म्हणाले होते की, अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर हे लोक सत्तेवर आल्यास सामान्य माणसांचे काय होईल, याबाबत विचार करा. ही टीप्पणी म्हणजे माझ्या आईचा नव्हे तर प्रत्येक मातेचा अपमान आहे. महिलांबद्दल असभ्य भाषेत बोलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. 

काय म्हणाले होते राजा? 
द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन आणि एडाप्पडी के. पलानीस्वामी यांची तुलना राजा यांनी केली होती. ते म्हणाले होते की, द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन आणि एडाप्पडी के. पलानीस्वामी यांची आपण तुलना करू. स्टॅलिन हे २३ वर्षांत ‘मिसा’ कायद्याअंतर्गत तुरुंगात गेले आणि त्यांनी पक्षाचे जिल्हा चिटणीस, कार्यकारी समिती सदस्य, युवा विभागाचे चिटणीस, खजिनदारपद आदी जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष व आता द्रमुकच्या अध्यक्षपदाची धुरा स्टॅलिन सांभाळत आहेत. नेते म्हणून त्यांची टप्प्याटप्प्याने जडणघडण झाली आहे. याचमुळे अधिकृत विवाहातून त्यांचा जन्म झाला, असे मी म्हणू शकतो. 

उलट जयललिता यांच्या मृत्यूपर्यंत इडाप्पडी पलानीस्वामी यांचे नाव कोणालाच माहिती नव्हते. सार्वजनिक जीवनातही त्यांना कोणी ओळखत नव्हते. म्हणजेच पलानीस्वामी हे राजकारणातील अवैध संबंधांमधून अकाली जन्मलेले बाळ आहे. पलानीस्वामी यांची किंमत स्टॅलिन यांच्या पादत्राणाएवढीही नाही, असे राजा म्हणाले होते.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT