Election Commission of India Sarkarnama
देश

Assembly Election 2023 : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाची नवी नियमावली

अनुराधा धावडे

New Delhi : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर नक्षलग्रस्त राज्य छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होतील. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात आणि 23 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना मतदान होणार आहे, मात्र, निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर केले जातील.

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रथमच अनेक गोष्टी घडणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. "निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी आम्ही मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राजकीय पक्ष आणि अंमलबजावणी संचालनालयासह (ED) सर्व संबंधित संस्थांशी चर्चा केली. (Assembly Election 2023)

राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सार्वजनिक करण्यासाठी उमेदवार तसेच राजकीय पक्षांसाठी सुधारित नियमावली निवडणूक आयोगाने जारी केली आहे. संबंधित उमेदवाराची निवड केल्यानंतर ४८ तासांच्या आत पक्षाला वृत्तपत्रे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि पक्षाच्या वेबसाइटवर संबंधित तपशील प्रसिद्ध करावा लागेल. (Election News)

पूर्वी नामांकन करताना उमेदवार प्रतिज्ञापत्रात त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड देत असत. सुधारित नियमावलीनुसार, उमेदवार आणि त्याच्या पक्षाला उमेदवाराचे गुन्हेगारी तपशील असल्यास वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर त्या संबंधिचे वृत्त प्रकाशित करावे लागेल. हे तीन वेळा करावे लागेल. (Political News) उमेदवारांसोबतच निवडणूक लढविणाऱ्या पक्षांनाही नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या उमेदवाराला तिकीट का दिले, हे पक्षाला निवडणूक आयोगाला सांगावे लागणार आहे. उमेदवारांनी त्यांचा गुन्हेगारी इतिहास लपविण्याचा प्रयत्न केल्यास आयोगाच्या नियमांनुसार त्यांचे नामांकनही रद्द होऊ शकते. यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजीव कुमार म्हणाले, निवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभने दाखवली जातात. ते टाळण्यासाठी 'जप्ती व्यवस्थापन प्रणाली' आणली जाणार आहे. आंतरराज्यीय सीमांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी आणि अवैध दारू, रोख रक्कम, मोफत वस्तू आणि ड्रग्ज पुरवठा रोखण्यासाठी एकूण 940 चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत.

मनी पॉवरचा वापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही आणि संशयास्पद ऑनलाइन रोख हस्तांतरांवरदेखील कडक नजर ठेवली जाईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये एकूण 1.77 लाख मतदान केंद्रे असतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT