Ghulam Nabi Azad- Ravindra Raina Sarkarnama
देश

Electricity Supply Cut : माजी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांचा वीजपुरवठा तोडला : भाजप नेत्याचे कनेक्शन आढळले बेकायदा

या सर्व नेत्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती, त्या कालावधीतही या नेत्यांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे.

सरकारनामा ब्यूरो

जम्मू : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना आणि भाजपच्या माजी आमदार नीलम लंगेह यांच्यासह जम्मूमधील (Jammu) ४०० लोकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज महामंडळाकडून तोडण्यात आला आहे. (Electricity supply of former Chief Minister Azad, BJP state president Ravindra Raina, former MLA was cut off)

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचे कनेक्शनच बेकायदेशीर आढळले आहे. माजी मुख्यमंत्री आझाद यांनी चार लाख रुपयांचे बिल भरलेले नाही. तसेच, लंगेह यांनी एक लाख रुपयांचे बिल भरलेले नाही. त्यांच्यावर वीज महामंडळाने कनेक्शन तोडत कारवाई केली आहे.

रवींद्र रैना हे सध्या गांधी नगर १४ अ, नीलम लंगेह गांधी नगर येथे राहतात, तर आझाद बंगला क्रमांक १, गांधी नगर येथे राहतात. उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचे वीज महामंडळाचे म्हणणे आहे. या सर्व नेत्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती, त्या कालावधीतही या नेत्यांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे.

वीजबिल न भरणाऱ्या इतर प्रभावशाली लोकांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असेही महामंडळाने म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा वीज महामंडळाने लोकांना बिल भरण्याचे आवाहन केले होते. अमेस्टी योजनेंतर्गत सुलभ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत महामंडळाकडून देण्यात आली होती. त्यानंतरही ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयांचीही वीज तोडली

थकबाकीमुळे वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल चारशेहून अधिक कनेक्शन तोडली आहेत. यासोबतच ४०० केव्हीच्या दोन रोहित्राची वीजही खंडित करण्यात आली आहे. येथे सफाई कामगार राहतात. याशिवाय नगरविकास विभाग आणि फूलशेती विभागाचाही वीजपुरवठा खंडीत केला आहे.

भाजप नेते म्हणतात, सुरक्षारक्षकांच्या खोलीची वीज तोडली

याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना म्हणाले की, मी सध्या राजोरी-पुंछच्या दौऱ्यावर आहे. सुरक्षारक्षकांच्या खोलीचा वीज खंडित केल्याचे त्यांना समजले आहे. मी एकटाच राहतो, त्या ठिकाणी. माझा बराचसा वेळ वेगवेगळ्या क्षेत्रात जातो. दोन-तीन महिन्यांत आम्ही वीजबिलही भरतो. जम्मूला पोहोचल्यानंतर नक्की काय परिस्थिती आहे, हे कळेल.

आझादांचे पीए म्हणतात चुकून वीज कापली

गुलाम नबी आझाद यांचे स्वीय्य सहायक दिल नवाज म्हणाले की, वीज महामंडळाने चुकून आझाद यांच्या अधिकृत निवासस्थानाचा वीजपुरवठा खंडित केला होता. पण पुन्हा ती पूर्ववत करण्यात आली. नगरविकास विभागाकडून वीजबिल भरले जाते.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई

वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जे ग्राहक वीजबिल भरणार नाहीत आणि ज्यांचे बेकायदेशीर कनेक्शन आहेत. या सर्वांवर कारवाई केली जाईल. कोणालाही नियमांचे उल्लंघन करू दिले जाणार नाही, असे वीज महामंडळाचे जम्मू विभाग दोनचे एक्सईएन राजेश शर्मा यांनी सांंगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT