Assembly Session
Assembly Session Sarkarnama
देश

विरोधकांना मोठा धक्का! विधानसभेतून आणखी 11 आमदार झाले निलंबित

सरकारनामा ब्युरो

अमरावती : विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार चकमक उडाली. विषारी दारूकांड प्रकरणी तेलगू देसम पक्षाच्या (TDP) सदस्यांनी पुन्हा विधिमंडळात आवाज उठवला. त्यांनी या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ घातला. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी अखेर टीडीपीच्या 11 आमदारांना निलंबित केले आहे. यावरुन आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपी अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

विषारू दारूकांड प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ घालणाऱ्या टीडीपीच्या 5 आमदारांना दोनच दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. आजही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर चर्चेसाठी विधानसभेचे कामकाज रोखून धरले.यामुळे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी टीडीपीच्या 11 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांनी टीडीपीच्या 11 आमदारांना एक दिवसासाठी निलंबित केल्याचे जाहीर केले. अशोक बेंदालम, आदिरेड्डी भवानी, निम्मकायला चिनाराजप्पा, गणाबाबू, भोगेश्वर राव, रामकृष्ण बाबू, रामराजू, गोट्टीपटी रवी, येलुरी संबाशिव राव, गड्डे राम मोहन आणि सत्यप्रसाद या आमदारांचा यात समावेश आहे.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात दोन दिवसांपूर्वी चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घातला होता. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली होती. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली होती. यावर आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनिवास यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली होती. यावरही टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ कायम ठेवला होता. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली होती. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली होती.

यानंतर सभागृहातील परिस्थिती गंभीर बनली होती. अखेर विधानसभा अध्यक्षांनी टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले होते. यात के. अचननायडू, जी.बुचय्या चौधरी, पाय्यवुला केशव, एन. रामा नायडू आणि डी.बाला वीरांजनेय स्वामी या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांचे निलंबन अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत कायम राहणार आहे. त्यांना अधिवेशन संपेपर्यंत विधिमंडळात प्रवेश करता येणार नाही. निलंबनानंतरही टीडीपीच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला होता. घोषणाबाजी सुरूच ठेवत ते विधानसभा अध्यक्षांच्या पोडिमयवरही चढले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना पाचारण केले होते. मार्शनली या आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT