<div class="paragraphs"><p>Farmers Agitation</p></div>

Farmers Agitation

 

Sarkarnama

देश

शेतकरी आंदोलक घरी परतले तरी दिल्लीच्या सीमा बंदच राहणार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हमीभावाच्या (MSP) प्रस्तावित कायद्यावरील केंद्राच्या समितीमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतीनिधींना स्थान देणे व काही मुद्यांवर सरकारकडून (Modi Govt) लेखी हमी या दोन ठळक बाबींबाबत केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर शेतकरी घरी परतू लागले असल्याने दिल्लीच्या सीमांनी वर्षभरानंतर मोकळा श्वास घेतला आहे.

तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीच्या (Delhi) गाझीपूर (Ghazipur) आणि सिंघू (Singhu) सीमेवरून घरी परतू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून या बंद असलेल्या सीमा रिकाम्या होऊ लागल्या आहेत. पण असे असले तरी या सीमा पुढील काही दिवसच बंदच ठेवल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नवीन वर्षात या मार्गावरील वाहनांची ये-जा सुरू करण्याचा विचार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत असल्याचे समजते.

गाझीपूर सीमा दिल्ली आणि गाझियाबादला जोडते. तर सिंघू सीमा हरयाणा व दिल्ली या राज्यांना जोडते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स टाकले होते. तसेच शेतकरी तिथून गेल्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडला आहे. हे सर्व हटवून रस्ता वाहतुकीयोग्य करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

किमान दोन आठवडे हे काम चालू शकते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. पण अद्याप वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला वर्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर संसदेतही ही कायदे मागे घेण्यात आले.

कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपी कायद्यासह (MSP) साऱया मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलकांपैकी कोणीही घरी जाणार नाही, यावर आंदोलक ठाम होते. त्यावर केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यात एमएसपीच्या प्रस्तावित कायद्यावर सराकरतर्फे नेमली जाणारी समिती , आंदोलक शेतकऱयांवरील गुन्हे मागे घेणे, मृत शेतकऱयांना नुकसान भरपाई आदी मुद्यांवर चर्चा झाली. या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT