IAS Officer Amneet Puran Kumar’s Complaint : हरियाणातील पोलीस महानिरीक्षक वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या पत्नी आयएएस अमनीत पी. कुमार यांनी पतीच्या आत्महत्येनंतर तातडीने पावले टाकत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच थेट मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले होते. अखेर त्यांच्या आक्रमक भूमिकेसमोर पोलीस प्रशासनाला गुडघे टेकवावे लागले आहेत.
IAS अमनीत यांच्या तक्रारीवरून चंदीगढ पोलिसांनी हरियाणाचे डीजीपी शभुजीत सिंह कपूर यांच्या 13 वरिष्ठ अधिकारी आणि माजी अधिकाऱ्यांविरोधात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला. पूरन यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेले हे सर्व अधिकारी आहेत. आपण मानसिक छळ, षडयंत्र आणि जातीभेदाचे शिकार ठरल्याचा गंभीर आरोप पूरन यांनी सुसाईड नोटमध्ये केला होता. त्यानुसार अॅट्रॉसिटी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 13 अधिकाऱ्यांमध्ये 9 आयपीएस आणि दोन आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर दोन निवृत्त अधिकारी या यादीत आहेत. देशात पहिल्यांदाच एका आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर डीजीपींसह वरिष्ठ दर्जाच्या एवढ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस पूरन यांच्या आत्महत्येवेळी त्यांच्या पत्नी अमनीत या मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर होत्या. तिथून परतताच त्यांनी पतीच्या पोस्टमार्टेमबाबत ठाम भूमिका घेत सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याशिवाय पोस्टमार्टेम होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
FIR मध्ये कुणाची नावे?
गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये डीजीपी शत्रुजीत कपूर यांच्यासह एडीजीपी संजय कुमार, एडीजीपी अमिताफ ढिल्लों, आयजीपी पंकज नैन, आयपीएस कला रामचंद्रन, आयपीएस संदीप खिरवार, आयपीएस सिबाश कविराज, निवृत्त डीजीपी मनोज यादव, निवृत्त डीजीपी पी. के. अग्रवाल, आयएएस टी. व्ही. एस. एन. प्रसाद, आयएएस आणि माजी अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
काय आहेत आयएएस अमनीत कुमार यांच्या मागण्या?
अमनीत कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात चार मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पहिली मागणी 13 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची होती. तसेत त्यांना निलंबित करून अटक करणे, दोन मुलींना सुरक्षा पुरविणे आणि कुटुंबाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचे रक्षण करण्याच्या मागण्या त्यांनी केला आहेत. त्यापैकी एक मागणी पूर्ण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.