Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices  Sarkarnama
देश

मोदी सरकारचं ऐतिहासिक पाऊल; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होणार?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे (Petrol-Diesel Price Hike) देशातील महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अबकारी कर कमी करून दरात घट केली असली तरी बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या जवळपास आहेत. त्यामुळे नागरिकांना महागाईतून अजूनही तितकासा दिलासा मिळताना दिसत नाही. त्यामुळे हे दर आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारने आपल्याकडील कच्च्या तेलाच्या आपत्कालीन राखीव साठ्यातील 50 लाख बॅरलचा साठा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं पहिल्यांदाच असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये इंधनाचे वाढते दर चिंतेचा विषय बनले आहेत. त्यामुळे अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया आदी प्रमुख इंधनाचे ग्राहक असलेल्या देशांसोबत समन्वय साधत भारताने हे पाऊल उचलल्याचं समजते. प्रत्येक देशाकडे असा साठा असतो. आपत्कालीन स्थितीत इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी हा साठा केला जातो.

कच्च्या तेलाचा साठा कधी खुला होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, पुढील दहा दिवसांत ही प्रक्रिया पार पडू शकते, असे सुत्रांनी सांगितले. केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी कर कमी केल्यानंतर सलग 20 दिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही क्रूडचे दर कमी झाले आहे.

मागील काही दिवसांत क्रूडचे दर प्रति बॅरल 84 डॉलरवर गेले होते. मागील दहा दिवसांत हे दर 78 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. त्यातच केंद्र सरकारने आता आपल्याकडील आपत्कालीन साठाही खुला करण्याचा निर्णय घेतल्याने इंधनाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हे दर किती कमी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सरकारच्या निर्णयाचा परिणाम पुढील काही दिवसांत दिसून येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

देशातील प्रमुख महानगरांमधील इंधनाचे दर

दिल्ली : पेट्रोल - 103.97 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.67 रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल - 109.98 रुपये प्रति लिटर, डिझेल - 94.14 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल - 104.67 रुपये प्रति लिटर, डिझेल - 89.79 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर, डिझेल - 91.43 रुपये प्रति लिटर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT