Covid Testing Sarkarnama
देश

ओमिक्रॉनचा धोका वाढला; एकाच रुग्णाच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह

देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, आरोग्य यंत्रणा सावध झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जगभरात भीतीचे सावट असलेल्या कोरोनाच्या (Corona) नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने आता भारतातही शिरकाव केल्याचे आज स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही ही माहिती जाहीर कऱण्यात आली आहे. कर्नाटकातील 46 वर्षीय व 66 वर्षीय नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. आता यातील एका रुग्णाच्या संपर्कातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या आहेत.

आरोग्य विभागाय सहसचिव लव अगरवाल यांनी भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. जगभरात आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. जगात या विषाणुचे आतापर्यंत 373 रुग्ण आढळून आले आहेत. सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून सर्व राज्यांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. आता बंगळूरमध्ये ओमिक्रॉनच्या एकाच रुग्णाच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा बंगळूरमधील डॉक्टर आहे. त्यांना 21 नोव्हेंबरला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. नंतर ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे तपासणीतून समोर आले होते. त्यांच्या थेट संपर्कात 13 जण तर अप्रत्यक्ष संपर्कात 250 जण आले आहेत. सरकारने त्यांना शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यास सुरवात केली आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळांवर काही ठराविक देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधनेही घालण्यात आली आहे. त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहे. या चाचण्यांमध्ये दोन रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आता संबंधित देशांतून भारतात आलेल्या प्रवाशांवर सर्वच राज्य सरकारांना बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT