Luizinho Faleiro and Mamata Banerjee
Luizinho Faleiro and Mamata Banerjee  Sarkarnama
देश

ममतांना मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी घेतली माघार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. आता त्यांना विधानसभा लढण्यास थेट नकार देऊन तृणमूलला धक्का दिला आहे. त्यांना न विचारता उमेदवारी जाहीर केल्याने ते नाराज होते. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर तृणमूलला हा मोठा धक्का बसला आहे.

फालेरो यांना फार्तोडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यांनी लढण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करुन मी हा निर्णय घेतला आआहे. मी एका ठिकाणी निवडणूक लढवून संपूर्ण राज्यात प्रचार करू शकत नाही. माझा आधीचा अनुभव सांगतो की, मी निवडणूक लढवल्यास राज्यभरात प्रचार करण्यावर मर्यादा येतात. मी फार्तोडातील तृणमूलचा उमेदवार म्हणून माघार घेत आहे. पक्ष या जागेवर नवीन उमेदवार देईल.

आता फालेरो यांच्या जागी फार्तोड्यातून सेओला वाझ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाझ या तरुण असून, त्या पेशाने वकील आहेत. त्या याच मतदारसंघातील रहिवासी असून मागील काही काळापासून तृणमूलमध्ये सक्रीय आहेत. आता फातोर्ड्यात त्यांचा सामना विजय सरदेसाई आणि दामू नाईक यांच्यासोबत होईल.

फलेरो हे गोवा काँग्रेसचे (Goa Congress) दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसला धक्का बसला होता. पुढील महिन्यात गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आक्रमकपणे उतरली आहे. इतर पक्षांतील नेत्यांना फोडून तृणमूलने जोरदार सुरवात केली होती. तृणमूल नेत्या व खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पक्षाने या निवडणुकीची धुरा सोपवली आहे. मात्र, निवडणूक जवळ येऊ लागताच तृणमूलला गळती लागली आहे. आता पक्षाच्या सरचिटणीसांनीच राजीनामा देऊन पक्षाला तोंडावर पाडले आहे. यतिश नाईक यांनी पक्ष सोडला आहे. त्यांना तृणमूलने उमेदवारी न देण्याचे कारण यामागे असल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT