Former Cricketer Dinesh Mongia joins BJP 

 

Sarkarnama

देश

क्रिकेटपटू दिनेश मोंगियासह काँग्रेसचे तीन आमदार आता भाजपच्या पीचवर!

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) यांनी भाजपमध्ये ((BJP) प्रवेश केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) भाजपने ((BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपने आता काँग्रेसला (Congress) धक्का देत तीन आमदार फोडले आहेत. याचबरोबर माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश करीत राजकीय इनिंग सुरू केली आहे.

दिनेश मोंगिया हे 44 वर्षांचे असून, ते मूळचे पंजाबमधील आहेत. त्यांनी आज भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यांना भाजपकडून विधानसभेच्या रिगणात उतरवले जाण्याची चर्चा आहे. मोंगिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपकडून यशस्वी इनिंग सुरू केली आहे. ते दिल्लीतून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता भाजपमध्ये दाखल झालेले मोंगिया हे दुसरे क्रिकेटपटू आहेत.

मोंगिया यांच्यासोबत काँग्रेसचे तीन आमदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काँग्रेसचे फतेहसिंग बाजवा, बलविंदरसिंग लड्डी आणि राणा गुरमित सोधी या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फतेहसिंग बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांचे बंधू आहेत.

याचबरोबर अकाली दलाचे माजी आमदार गुरतेजसिंग गुढियानी, युनायटेड अकाली दलाचे माजी खासदार राजदेवसिंग खालसा आणि पंजाब-हरयाना उच्च न्यायालयातील वकील मधुमित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पंजाब प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. राज्यात केवळ तीनच आमदार असलेल्या भाजपची ताकद यामुळे वाढली आहे.

राज्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीच्या ताब्यात सत्ता काबीज केली होती. हे दोन्ही पक्ष सलग 10 वर्षे राज्यात सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT