BJP politics Sarkarnama
देश

BJP news : भाजपचा ट्रिपल धमाका; तीन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कमळ घेतले हाती...

Sushmita Dev, Prakash Chik Baraik, Sukhendu Sekhar Roy : तीन जागा निवडून आणण्यासाठी भाजपला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाही. तृणमूलमधील काही आमदारही भाजपला या निवडणुकीसाठी मदत करू शकतात, अशी चर्चा आहे.

Rajanand More

TMC leaders join BJP : भारतीय जनता पक्षाने विरोधकांना जोरदार झटका दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी गुरूवारी (ता. ९) भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी या नेत्यांनी अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबत मौन बाळगले होते. मात्र, रिक्त जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी भाजपची वाट धरली.

विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेच्या २० खासदारांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. तर सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक या तिघांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते तिघेही बंगालमधून निवडून गेले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या तीन रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच या तिन्ही नेत्यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या तिघांना पुन्हा भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. राज्यात भाजपचे २०८ खासदार आहेत. त्यामुळे तीन जागा निवडून आणण्यासाठी भाजपला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाही. तृणमूलमधील काही आमदारही भाजपला या निवडणुकीसाठी मदत करू शकतात, अशी चर्चा आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांच्याच उपस्थितीत तिघांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यानंतर मीडियाशी बोलताना भट्टाचार्य यांनी पक्षप्रवेशाचे समर्थनही केले. ते म्हणाले, राज्यात ३४ वर्षे डाव्यांचे राज्य होते. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे. केंद्र सरकारशी सहकार्य करण्याऐवजी विरोधाचा मार्ग अवलंबण्यात आला. त्यामुळे विकास थांबला होता.

तिघांनी याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिघेही दिग्गज असून राज्यसभेतील त्यांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे कौतुकही भट्टाचार्य यांनी केले. तिघांचा प्रवेश आमच्यासाठी आनंददायी आहे. संपूर्ण भाजप खूश आहे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करत आहोत, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुखेंदू शेखर रॉय यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. ममता बॅनर्जी यांचे राजकारण संपले आहे. त्यांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे त्यावर आणखी चर्चा करण्यात अर्थ नाही. अन्य राज्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विकासाचा अजेंडा राबविण्यासाठी एकत्रितपणे केंद्र सरकारशी संवाद साधतात. मात्र इथे आम्ही बंद, आंदोलनातून केंद्राला विरोध केला. त्यामुळे बंगालच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या. आम्ही चोरी करण्यात व्यस्त होतो. आम्ही लुटारू आणि बलात्कार करणाऱ्यांना वाचवत होतो, अशी टीकाही रॉय यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT