मोहाली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjitsingh Channi) यांचे पुत्र नवजीतसिंग (Navjit Singh) यांचा विवाह नुकताच झाला. हा विवाह सोहळा वेगळ्याच कारणासाठी गाजू लागला आहे. या सोहळ्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता आणि अनेक पोलीस (Punjab Police) अधिकारी दारू पिऊन धुंद असल्याचे समोर आले होते. अखेर या प्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सुखबीरसिंग, जसकरनसिंग, दर्शनसिंग आणि सतबीर या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. हे चौघे कार्यक्रमाच्या बाहेर बंदोबस्तासाठी होते. ते त्यांची नियोजित जागा सोडून आतमध्ये घुसले. मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय असलेल्या ठिकाणी त्यांना प्रवेश केला. दारुच्या नशेत असलेल्या या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फीही घेतली होती. या चौघांना निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मोहालीचे पोलीस अधीक्षक नवज्योतसिंग महल यांनी दिली.
विवाह सोहळ्याच्या व्हिडीओ फुटेजमध्ये या पोलिसांचे प्रताप कैद झाले आहेत. विशेष म्हणजे ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने या पोलिसांना रोखले नाही. मोहालीच्या गुरुद्वारामध्ये 10 ऑक्टोबरला हा विवाह झाला. मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले होते. त्यांनी म्हटले होते की, विवाह सोहळ्यात साध्या वेशात बंदोबस्तावर असलेले अनेक पोलीस दारु पिऊन धुंद झाले होते. याचवेळी कमांडो हे मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यात गुंतले होते. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही गायब झाले होते. कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. अनेक सुरक्षा कर्मचारी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आतमध्ये पोचले होते. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्यांची तपासणी केली जात नव्हती.
संगीत कार्यक्रमाच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. तेथे बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष संगीतमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या खाण्यापिण्यात गुंतल्या होत्या. काही पोलीस अधिकारी मंत्र्यांच्या पाया पडतानाही दिसले. मुख्यमंत्र्यांची सुरक्षेची जबाबदारी असलेले कमांडो हे मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहण्यात गुंग होते. कुणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हीआयपी असल्याचे सांगून थेट प्रवेश करीत होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.