Ajit Pawar, Arvind Kejriwal, Mohan Bhagwat, Narendra Modi Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : ED-CBI चा गैरवापर ते अजितदादांचं उपमुख्यमंत्रिपद केजरीवालांनी सरसंघचालकांना विचारले 'हे' 5 प्रश्न

Jagdish Patil

Navi Delhi News, 25 Sep : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धीवर संघाचा काही अंकुश आहे की नाही? की भाजप जे काही करत आहे त्याला संघाचा पाठींबा आहे? असे प्रश्न त्यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत.

शिवाय भाजपच्या कार्यपद्धतीमुळे देशातील परिस्थिती खूप भयानक आणि घातक झाली असून लोकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जे मी तुमच्यासमोर मांडत आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आल्या पत्रातून भागवत यांना प्रश्न विचारले आहेत. केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रात लिहिलं, मी हे पत्र एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून नव्हे, तर या देशाचा सामान्य नागरिक म्हणून लिहीत आहे.

आज देशातील परिस्थितीबद्दल मी खूप चिंतीत आहे. भाजपचे केंद्र सरकार ज्या दिशेने देशाला आणि देशाच्या राजकारणाला घेऊन जात आहे, ते देशासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपून जाईल, देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका, नेते येतील जातील, पण भारत देश नेहमीच राहील. या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवण्याची जबाबदारी आपली आहे. यासंदर्भात लोकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे मी तुमच्यासमोर मांडत आहे. माझा हेतू फक्त भारतीय लोकशाही वाचवणे एवढाचं आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी भागवत यांना प्रश्न विचारले आहेत.

बेईमानी करून सत्ता मिळविणे 'आरएसएस'ला मान्य आहे का?

त्यातील पहिला प्रश्न त्यांनी ईडी-सीबीआयच्या गैरवापराबद्दल विचारला आहे. देशभरात विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा ईडी-सीबीआयला धाक दाखवून इतर पक्षातील नेते फोडले जात आहेत, त्यांचे पक्ष तोडून इतर पक्षांचे सरकार पाडले जात आहे. अशा प्रकारे निवडून आलेली सरकारे पाडणे देशासाठी आणि लोकशाहीसाठी योग्य आहे का? कोणत्याही प्रकारे बेईमानी करून सत्ता मिळविणे हे 'आरएसएस'ला (RSS) मान्य आहे का?

हे बघून तुम्हाला वाईट वाटत नाही का?

तर या पत्रात अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव न घेता त्यांच्या भाजपसोबतच्या युतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. देशातील काही नेत्यांना पंतप्रधानांनी भ्रष्टाचारी म्हटलं होतं आणि काही दिवसांनी त्याच नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 28 जून 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी जाहीर भाषणात एका नेत्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तेच आता भाजपसोबत सत्तेत आहेत.

कालपर्यंत ज्याला भ्रष्टाचारी म्हटलं जात होते, त्याच नेत्याला उपमुख्यमंत्री केलं. इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत. तुम्ही किंवा आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी अशा भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला वाईट वाटत नाही का?, असंही केजरीवाल यांनी विचारलं आहे.

भाजपला 'आरएसएस'ची गरज नाही?

दरम्यान, आरएसएस ही भाजपची मातृसंस्था असून जर भाजपची दिशाभूल होत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी संघाची असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली आहे. तर या पत्रात जे.पी. नड्डा यांनी भाजपला आता आरएसएसची गरज नाही, अशा केलेल्या वक्तव्याची जाणीव देखील या पत्राद्वारे करून देण्यात आली आहे. शिवाय नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा धक्का बसला आहे. देशाला हे जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्याचा तुमच्या मनावर काय परिणाम झाला? असा प्रश्न त्यांनी भागवत यांना विचारला आहे.

तर शेवटी लालकृष्ण अडवाणी 75 वर्षे पूर्ण करून निवृत्त झाले, तो कायदा नरेंद्र मोदीजींना लागू होणार नाही का? असा प्रश्न त्यांनी भागवत यांना विचारला आहे. तसंच हे सर्व प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात येत असून मला आशा आहे की आपण या प्रश्नांचा विचार कराल आणि उत्तरे द्याल, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आता या पत्राची दखल सरसंघचालक घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT