Mukul Wasnik
Mukul Wasnik Sarkarnama
देश

मुकुल वासनिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी? 23 ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलं होतं नाव

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्षांशिवाय राजकारणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या काँग्रेसला (Congress) पाच राज्यांतील निवडणुकांमधील पराभवाने मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) या सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असल्यातरी पडद्यामागून राहुल गांधीच निर्णय घेत असल्याचा दावा नाराज गटातील नेत्यांकडून केला जातो. जी 23 या नाराज गटानं अध्यक्षपदासाठी सरचिटणीस मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते, असे समोर आलं आहे.

पाच राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी (ता. 13) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये निवडणुकांमधील पराभव व आगामी अधिवेशानातील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर पुन्हा अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. त्यातच मुकूल वासनिक यांचं नाव अचानक समोर आलं आहे.

काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी 23 (G 23) या गटाने अध्यक्षपदासाठी वासनिक यांचं नाव सुचवलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिली. पण हे नाव स्वीकारण्यात आलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या गटामध्ये आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद व इतर मुद्दांवरून पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती.

याच जी 23 गटात समावेश असलेल्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी वर्ष 2000 च्या सुरुवातीला ज्या पध्दतीनं पक्ष चालवला त्याच पध्दतीने नवीन अध्यक्षांनी पक्षाचे नेतृत्व आणि अपेक्षित आहे. सोनिया गांधी सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असल्या तरी के. सी. वेणूगोपाल, अजय माकन, रणदीप सुरजेवाला हेच पक्ष चालवत आहेत. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही, असा दावाही सुत्रांनी केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्ष नाहीत. पण ते पडद्याआडून पक्ष चालवत असून निर्णयही घेत आहेत. ते खुलपणाने बोलत नाहीत. आम्ही पक्षाचे हितचिंतक आहोत, शत्रु नाही, असंही सुत्रांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पाच राज्यांमधील पराभवानंतर काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळून येऊ लागला आहे. उत्तर प्रदेशात काही नेत्यांनी थेट प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या राज्यात सक्रीय झाल्यानंतर 30 माजी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याचा दावा त्यांनी केला होता. पंजाबमध्ये नवज्योसिंग सिध्दू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT