PM Narendra Modi, Pramod Sawant Sarkarnama
देश

एक्झिट पोलनंतर गोव्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी'; मुख्यमंत्री थेट मोदींच्या भेटीला

बहुतेक एक्झिट पोलमध्ये गोव्यात भाजपला एकहाती सत्ता मिळणार नाही, असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : बहुतेक एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) गोव्यात भाजपला एकहाती सत्ता मिळणार नाही, असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) नेते खडबडून जागे झाले असून 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. 2017 मध्ये भाजपने काँग्रेसच्या (Congress) तोंडचा घास पळवला होता. त्याचीच पुनरावृत्ती 2022 मध्येही करण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) सज्ज झाले आहेत. त्यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली.

सोमवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गोव्यामध्ये त्रिशंकू स्थिती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पारडं जड असल्याचे काही पोल्समध्ये दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress Party) सोबत युती करण्यास तयार आहे, अशी घोषणा केली आहे.

भाजपनेही सावध पावले टाकत जुना मित्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची (MGP) सोबत घेणार असल्याचे संकेत दिले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सावंत म्हणाले, भाजपला 20 पेक्षा जास्त जागा मिळतील. बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप जिंकत असल्याचे दिसत आहे. आम्ही अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू. केंद्रीय नेत्यांकडून त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे. गरज भासल्यास मगोपचीही मदत घेऊ.

मीच मुख्यमंत्री होणार...

पंतप्रधान मोदी यांची मी आज भेट घेतली. यामध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. आम्ही सर्वाझिक जागा मिळवत सत्ता स्थापन करू. त्यामुळे मला पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी पक्षाकडून दिली जाईल, असं वाटतं. भाजपनंही याबाबत सांगितलं आहे, मग ते नक्की तसंच होईल. भाजप जे बोलते ते करते, असंही सावंत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सावंत यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा आपला दावा सांगितल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसची जय्यत तयारी

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी म्हटलं आहे की, जो पक्ष भाजपच्या विरोधात असेल त्या पक्षाशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही. परंतु जो पक्ष भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यांना आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत. निवडणुकीतील प्रचारादरम्यान आप आणि टीएमसीने (TMC) आमच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. परंतु निकालानंतर आम्ही कोणासोबत जायचे याबाबत लवकरच निर्णय घेवू. भाजपला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायचे आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेससोबत युती केलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT