Aleixo Sequeira Sarkarnama
देश

Goa Minister Aleixo Sequeira News : 'ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सरकारी खात्यात..' ; गोव्याच्या कायदा मंत्र्यांचं आणखी एक विधान!

Goa News MLA Lobo : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे जाहीरपणे सांगून टाकले होते

Mayur Ratnaparkhe

Goa Political News : ‘सर्वत्र अमलीपदार्थ उपलब्ध असतात’ या कायदामंत्री अ‍ॅलेक्स सिक्वेरांच्या विधानाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘त्यांची जीभ घसरली होती’, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असतानाच सिक्वेरा यांनी आज नवा वाद निर्माण केला आहे.

रात्री १० नंतर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकाराच्या विविध खात्यांचा समन्वय नाही, असे त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे सरकारच्या गलथान कारभाराचा चेहरा सर्वांसमोर आला आहे.

मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना सिक्वेरा यांनी सर्वत्र अमली पदार्थ मिळतात, त्यासाठी संपर्क कशाला हवा, असे विधान केले होते. त्यानंतर सारवासारव करताना त्यांनीच आपल्याला ‘सर्वत्र’ म्हणजे ‘जगभरात’ असे म्हणायचे होते, असे सांगून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनीही कायदामंत्र्यांची जीभ घसरली, असेल असे सांगून याविषयातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

तरीही त्यांनी आता रात्री दहा वाजेनंतर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी यंत्रणा बसवली आहे. मात्र, कारवाई ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाते, असे सांगून विविध खात्यांत याविषयी समन्वय नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी यासाठी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासनही दिले आहे.

सरकारने कारवाई करायचे ठरवले तर विविध यंत्रणा एकाच वेळी कामाला लागतात, असा जनतेचा अनुभव आहे. यामुळे पर्यावरण खात्याने दोन्ही प्रदूषणाविषयी कारवाई करण्याचे ठरवले तर त्याला महसूल खात्याची साथ मिळत नाही, असे चित्र सिक्वेरा यांच्या विधानानंतर उभे राहिले आहे. यापूर्वी विधेयके तयार करण्यावरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कायदा खात्यावर बोट ठेवले होते. त्यालाही जाहीरपणे सिक्वेरा यांनी प्रत्युत्तर दिले होते.

सत्ताधारी गोटात अशांततेचे वातावरण -

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे जाहीरपणे सांगून टाकले होते. त्यांना जाब विचारण्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लोबो यांचे घर गाठले. मात्र, लोबो यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे सांगत तानवडे यांनी त्यांना त्यांचे काही चुकले नाही, असे प्रमाणपत्र दिले.

अलीकडच्या या काही घटनांमुळे सत्ताधारी गोटामध्ये असलेली अशांतता उफाळल्याचे दिसून येते. मध्यंतरी सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची चर्चा सुरू झाली होती. त्याची कुणकूण लागल्यामुळे ते सत्य सांगत असावेत, असा टोला आता समाजमाध्यमावर हाणला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT