Goa Political News : मडगावातून मी तब्बल आठवेळा जिंकून आलेलो आहे. मडगावच्या प्रत्येक मतदाराला मी नावानिशी ओळखतो. मडगावच्या मतदारांनीही मला अगदी ‘उलटा-सुलटा’ म्हणतात, तसे पारखून पाहिले आहे.
मतदारांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तो ढळत नाही, तोवर माझ्यावर कुणीही आणि कशीही टीका केली, म्हणून मी चिंता करत नाही, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
सध्या माजी होमगार्ड विमल शिरोडकर यांच्या घराच्या दुरुस्तीवरून वाद निर्माण झाला आहे. ही दुरुस्ती श्रेय मिळणार नाही, असे वाटल्याने मामलेदारांना पाठवून ती अडवून ठेवली, अशी विरोधकांनी कामतांवर टीका केली आहे. त्यामुळे सध्या मडगावात हा चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कामत म्हणाले, मी दुरुस्ती अडवली, असे जे माझ्यावर आरोप करतात, त्यांनी प्रत्यक्षात शिरोडकर ज्या भाटकाराच्या घरात रहातात, त्यांच्याशी साटेलोटे करुन त्यांना पत्र्याचे तकलादू घर बांधून देण्याचे ठरविले होते. मात्र हे घर पक्के चिऱ्यांच्या भिंतीचे असावे, असा माझा आग्रह होता.
पत्र्याचे घर बांधण्यास माझा विरोध होता. सर्वात आधी तिथे आमचे नगरसेवक महेश आमोणकर पोचले. त्यानंतर मी. त्यानंतर तिथे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस हेही आले. त्यांना तिथे कुणी आणले, माहीत नाही. पण शिरोडकर यांना कुणी मदत करत असेल, तर मला त्याचा आनंदच होईल, असेही कामत यांनी स्पष्ट केले.
मडगाव कोसळू लागलेय, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली होती. यावर कामत म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी डोळसपणे पहावे. मडगावात रेल्वे ओव्हरब्रिज, सुसज्ज असे रवींद्र भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चार मजली जिल्हा रुग्णालय हे सर्व प्रकल्प मी आमदार आणि मुख्यमंत्री असताना केले आहेत.
आताही नवीन प्रकल्प उभे राहत आहेत. त्यात सहापदरी रेल्वे ओव्हरब्रिजसह बहुमजली पार्किंग प्रकल्पही आहेत. पालिका परिसराचे सौंदर्यीकरणासाठी दोन आठवड्यांत निविदा जारी होतील, हा विकास नव्हे का? असा सवाल कामत यांनी केला.
...त्यामुळे तरी तोंडी देवाचे नाव!
दिगंबर कामत हे देवाशी बोलतात, अशी टीका विरोधक करतात. विशेषत: विजय सरदेसाई हा मुद्दा वारंवार उपस्थित करून कामत यांची खिल्ली उडवतात. याबद्दल कामत यांना विचारले असता, त्यांना माझी खिल्ली उडवायची असेल तर त्यांना ती खुशाल उडवू दे. निदान यामुळे तरी त्यांच्या तोंडी देवाचे नाव येते, हे खूप झाले असे ते म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.