Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
देश

India Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेटला सरकारची मंजुरी! "पहलगाममधील शहिदांच्या कुटुंबियांना विचारलत का?"

India Pakistan Cricket: ९ सप्टेंबरपासून आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान एकत्र खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

Amit Ujagare

India Pakistan Cricket: पुढच्या महिन्यात ९ सप्टेंबरपासून आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांविरोधात खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळं दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळं भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध देखील छेडलं गेलं होतं पण ते लगेचच थांबवलंही गेलं. यापार्श्वभूमीवर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला देत सिंधू जल करार स्थगित केला होता.

तसंच ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याकडून थेट हवाई कारवाईद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच या घडामोडी घडलेल्या असताना आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान एकत्र खेळण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यावरुन आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला धारेवर धरलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी देण्यापूर्वी तुम्ही पहलगामध्ये शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना विचारलं होतं का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले, हिंदुस्थानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधानांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मालाच आलेला नाही. काल त्यांच्या सरकारने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खास करून पाकिस्तानबरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला. हा प्रकार धक्कादायक आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढण्याचा निर्णय काल त्यांनी घेतला.

मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले की, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे त्यासाठी आपण पहलगाममध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलंत का? त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आपली अशी कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात? एका बाजूला तुम्ही म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही.

पाकिस्तानला आपण जे सिंधू नदीच पाणी देतो ते आम्ही अडवतो, मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं काय? याच उत्तर त्यांना द्यावं लागेल. हा निर्लज्जपणा आहे, हे जर दुसरं कोणाचं सरकार असतं आणि हा जर निर्णय घेतला असता तर या लोकांनी संपूर्ण देशभरात एक आंदोलन उभं केलं असतं. पण पंतप्रधानांनी शांतपणे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली.

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचं आहे. या देशातले लोक तिकडे जाणार मॅच बघायला, अमित शहा यांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला बसणार ऐटीमध्ये आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा व्यापार करणार. हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे. आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू असताना, पहलगाममध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, परक्या झालेल्या कुटुंबियांचे अश्रू सुकले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही, आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. आमचं मन जळतंय, आम्ही आक्रोश पाहिलाय, आम्ही ढोंगी नाही, आमचं हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्क आहे. भाजपा सारखे आम्ही ढोंगी नाहीत.

महाराष्ट्रात किंवा देशात असा सामना झाला असता तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले असते. महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं पण दिल्लीत जरी झाला असता तर सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावली असती. पाकिस्तान शरण आला होता म्हणताना, मग क्रिकेट कसले खेळत आहात. तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय? हा आमचा साधा प्रश्न आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी याप्रकरणी कठोर शब्दांत सरकारवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT