Narendra Modi and Satyapal Malik
Narendra Modi and Satyapal Malik  Sarkarnama
देश

ते माझ्यासाठी मेले का? मोदींसोबतच्या बैठकीतील भांडण थेट राज्यपालांनीच केलं उघड

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्र सरकारला धारेवर धरतात. आता मलिकांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीबाबत खळबळजनक खुलासा केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनावरून दोघांमध्ये झालेल्या बैठकीबाबत सांगत मलिकांनी पंतप्रधानांना अंहकारीही म्हटले आहे.

मलिकांनी रविवारी हरियाणा येथील दादरीमध्ये एका सामाजिक कार्यक्रमात संवाद साधताना हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मी पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. त्यावेळी पाच मिनिटांच्या बोलण्यातच आमचा वाद झाला होता. ते खूप अहंकारात होते. मी जेव्हा त्यांना म्हणालो की, 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते म्हणाले, माझ्यासाठी मेले आहेत का?

मोदींच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्याचे मलिकांनी सांगितले. तुमच्यासाठी हे लोक मेले आहेत. कारण तुम्हा राजा बनले आहात, असं आपण मोदींना म्हणाल्याचे मलिकांनी सांगितले. यावरून त्यांच्याशी भांडण झाल्याचेही मलिकांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी त्यानंतर मला अमित शहांना भेटायला सांगितले. मी शहांनाही भेटलो. जेव्हा कुत्रा मरतो तेव्हा पंतप्रधान शोक संदेश पाठवतात. पण शेतकरी मृत्यूवर ते गप्प राहिले, असंही मलिक म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल मलिक हे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका करीत आहेत. त्यांनी आधीही उघडपणे शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला सुनावले होते. घटनात्मक पदावर असतानाही राज्यपाल मलिक हे केंद्र सरकारला लक्ष्य करीत आहेत, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले होते की, अनेक राज्यपालांनी याआधी सरकार विरोधात भूमिका घेतली आहे. राज्यपाल जेव्हा लोकनियुक्त सरकारे घालवतात तेव्हा सगळे मौन धारण करतात. माझ्या राजीनाम्याचा प्रश्न आलाच तर मला नियुक्त करणाऱ्या सरकारने आज सांगितल्यास आजच्या आज मी लगेच राजीनामा देईन.

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी केल्यानंतर आता शेतकरी हमी भावाला कायदेशीर आधार द्यावा, अशी मागणी करीत आहेत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. यावरून राज्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी मान्य करून घेऊन शेतकऱ्यांनी आपापल्या घरी जावे, अशी गुगली टाकली होती. त्यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांच्या हमी भावाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देऊन आपल्याच सरकारची कोंडी केली होती. शेतकऱ्यांनी हमी भावाच्या पलिकडे ताणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT