Congress
Congress Sarkarnama
देश

Gujrat Election : काँग्रेसचं ठरलं! गुजरात निवडणुकींसाठी रणनिती, 15 दिवसात 25 सभा!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : (Gujrat Election) : हिमाचल प्रदेशातील विधानसभेत निवडणुका पार पडल्यानंतर आता काँग्रेसने आपला संपूर्ण जोर मिशन गुजरातवर केंद्रित केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस येत्या 15 दिवसांत एकूण 25 सभांचे आयोजन केले आहे. यामध्ये जवळपास 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. काँग्रेसच्या या सभा पक्षाचा प्रचार आणि प्रसार आणि निवडणुकीच्या रणनीती अंतर्गत असतील, सभांमध्ये पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी गेले नव्हते, मात्र ते गुजरातमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक गेहलोत, भूपेश बघेल असे दोन मुख्यमंत्री; काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी, यांच्याशिवाय पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक वर्गातील मोठे नेतेही येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये सभांमध्ये असतील.

2017 च्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी राज्यात पक्षाचे नेतृत्व केले होते. यामुळे काँग्रेसने भाजपला दोन अंकी म्हणजेच ९९ इतक्या संख्येवर आणून ठेवले होत. काँग्रेसची ही गेल्या तीन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी होती. यावेळी मात्र काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत बूथ व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करत आपली रणनीती बदलली आहे.

राहुल गांधी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये द्वारका येथील राज्यस्तरीय चिंतन शिबिर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली; त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने ‘मूक प्रचार’ योजना राबवली. शिवाय, काँग्रेसने यावेळी मोठ्या प्रमाणात घरोघरी प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत म्हणजे १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. भाजप आणि काँग्रेससोबत आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे गुजरातमधील निवडणूक यावेळी तिरंगी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT