Chief Election Commissioner Gyanesh Kumar faces growing political pressure amid the Election Commission controversy and a fresh Kerala probe. Sarkarnama
देश

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना पहिला सर्वात मोठा झटका; इंजिनिअरची आत्महत्या भोवणार, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Gyanesh Kumar controversy : निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांच्या कालावधीत मतदार यादी, मतदार नोंदणी तसेच तांत्रिक व्यवस्थेशी संबंधित निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे.

Jagdish Patil

Gyanesh Kumar Controversy : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांच्या कालावधीत मतदार यादी, मतदार नोंदणी तसेच तांत्रिक व्यवस्थेशी संबंधित निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने मुंबईसह दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं सुरू केली आहेत.

तर मुंबईत देखील ठाकरे बंधूंनी गर्जना मोर्चाचं आयोजन करत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रान उठवलं आहे. त्यामुळे चहूबाजूंनी ज्ञानेश कुमारांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता केरळमधील ज्ञानेश कुमार यांच्या जुन्या प्रशासकीय कार्यकाळाशी संबंधित प्रकरण समोर आल्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी २००६ मधील मलेशियन अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येप्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास व्हिजिलन्स अँड अँटी-करप्शन ब्युरोमार्फत केला जाणार आहे. ली सी बीन हे केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत एमसी रोडच्या सुधारणेच्या कामाशी संबंधित PATI-BEL कंपनीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या आत्महत्येनंतर एक पत्र आढळले होते.

त्या पत्रामध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची २००६ मध्ये प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र, तपासावर राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरून दबाव आणण्यात आल्याने चौकशी पूर्णत्वास गेली नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील जुन्या कागदपत्रांची आणि फाइल्सची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश व्हिजिलन्स विभागाला दिले आहेत. बाहेरील प्रभावामुळे तपास प्रभावित झाला असेल तर त्याचीही वस्तुनिष्ठपणे पडताळणी करण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, निवडणूक आयोगातील कथित आक्षेपांवरून ‘इंडिया’ आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे निवडणूक आयोगाच्या कामकाजामुळे वादात सापडलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत केरळमधील जुन्या प्रकरणाच्या चौकशीमुळे आणखी भर पडल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT