H.D.Kumaraswmay and B.S.Yediyurappa File Photo
देश

येडियुरप्पा अन् त्यांच्या पुत्राचे तोंड बंद करण्यासाठीच छापे! माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांचे तोंड बंद करण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांनी बंगळूरसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यक (PA) एम.आर. उमेश (M.R.Umesh) यांच्या घर व कार्यालयावरही छापा घालण्यात आला होता. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांचे तोंड बंद करण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी (H.D.Kumaraswamy) यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपने नेतृत्वाने त्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना सुरवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. नंतर राज्यात हनगळ आणि सिंदगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांनी प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या पीएवर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

येडियुरप्पांचा आवाज दाबण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. कुमारस्वामी म्हणाले की, येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ते दोघे काही तरी करतील, अशी भीती भाजप नेतृत्वाला आहे. यामुळे त्यांना रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने हे पाऊल उचलले.

जलसंपदा विभागातील निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर विभागाने मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांचे पीए उमेश हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे.

उमेश यांच्यावरील छाप्याने येडियुरप्पा हे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम साहित्याचे व्यापारी आणि येडियुरप्पांचे पुत्र बी.विजयेंद्र यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर छापे घालण्यात आले. बंगळूरसह, बागलकोट, तुमकूर येथे छापे घालण्यात आले. यात कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.

येडियुरप्पांचे पीए उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचा रहिवासी आहेत. ते सुरवातीला बीएमटीसीमध्ये वाहक कम चालक म्हणून काम करीत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत ते काम करीत होते. नंतर त्यांची आमदार अय्यनूर मंजुनाथ यांचे स्वीय सहायक म्हणून काही काळ नियुक्ती झाली होती. येडियुरप्पांचे स्वीय सहायक म्हणून ते 2012 पासून काम करीत होते. विजयेंद्र यांचेही ते निकटवर्ती होते. उमेश यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT