Harish Rawat Sarkarnama
देश

पक्षातून हकालपट्टी अन् माझं होळीत दहन करा! पराभवानंतर माजी मुख्यमंत्री वैतागले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये (congress) वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर काही नेत्यांनी ठपका ठेवला आहे. तर पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिध्दू यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आता उत्तराखंडमधील वादही चव्हाट्यावर आले आहेत. माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांनी हतबलता व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं आहे.

उत्तराखंडमध्ये निवडणुकीआधीही (Uttarakhand Election 2022) हरीश रावत यांनी पक्षातील विरोधकांबाबत नाराजी व्यक्त करणारं ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पक्षानं त्यांना प्रचार प्रमुख करत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता आपण पैसे घेऊन निवडणुकीत तिकीट आणि पदं वाटल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केल्याचा दावा रावत यांनीच केला आहे.

रावत यांनी ट्विट करून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पैसे घेऊन पदं आणि तिकीट वाटल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्र्यासह पक्षातील अनेक पदं भूषवलेल्या एका नेत्याविरोधात असे आरोप होत असतील तर पक्षानं आपली हकालपट्टी करावी. पक्षात एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच असे आरोप केले जात आहे. त्यांच्या समर्थकांकडूनही हे आरोप पसरवले जात आहेत.

मी देवाला विनंती करतो की, काँग्रेसने माझ्यावर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करावी, असं रावत यांनी म्हटलं आहे. तसेच हरीश रावतरुपी वाईट गोष्टीचे होळीमध्ये काँग्रेसने दहन करायला हवे, असं वक्तव्यही रावत यांनी केलं आहे. त्यामुळं उत्तराखंडमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

प्रचार समितीचे अध्यक्ष या नात्याने रावत यांनी सर्वांची माफीही मागितली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने (BJP) 47 जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. राज्यात भाजपविरोधात नाराजी असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळेल, असा दावा नेत्यांकडून केला जात होता. पण प्रत्यक्षात पक्षाला 70 पैकी केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT