Uttarakhand Congress News: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांचे निकटवर्तीय आणि माजी OSD चंदन सिंह जीना यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रावत यांनी हा निर्णय घेतला. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली.
त्यांनी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतील सदस्यत्वासह राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस कार्यसमितीच्या स्थायी आमंत्रित सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कोणत्याही कृतीमुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला धक्का लागू नये, अशी माझी भूमिका असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
2016 मधील ग्राम पंचायत विकास अधिकारी भरती परीक्षेतील कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने देहरादूनमधील विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये चंदन सिंह जीना यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता.
ED च्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान सुमारे 32 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, 200.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 12 महागड्या घड्याळ्या आढळल्या. तसेच जीना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमधील सुमारे 52.16 लाख रुपये गोठवण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. चंदन सिंह जीना हे रावत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात OSD म्हणून कार्यरत होते. सध्या ते रावत यांचे PA म्हणून काम करत आहेत.
चंदन सिंह जीना यांच्या घरातून रोकड आणि दागिने सापडल्याचे दावे माध्यमांमध्ये दाखवले जात आहेत. मात्र, या प्रकरणाचे सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे हरीश रावत यांनी म्हटले आहे.
जीना हे आपले जुने सहकारी असल्याचे सांगत रावत म्हणाले की, 2016 मधील भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोप सिद्ध झाले, तर ते त्यांच्यासाठी निश्चितच लज्जास्पद असेल. मात्र, सध्या करण्यात येत असलेल्या आरोपांवर आपला विश्वास नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रावत यांनी या कारवाईमागे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलण्याचा आणि नवा राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. मात्र, अशा परिस्थितीत त्यांच्या वैयक्तिक भूमिकेमुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी पदांवरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना हरीश रावत यांनी सांगितले की, त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात 42 हजारांहून अधिक सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत अनवधानाने काही चूक झाली असेल, तर त्याबद्दल त्यांनी उत्तराखंडच्या जनतेची माफी मागितली.
भरती आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार समोर आल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यावेळी नियुक्तीचा निर्णय संबंधित अधिकाऱ्याचा जुना सेवा रेकॉर्ड आणि गुणवत्तेच्या आधारे घेतल्याचे रावत यांनी सांगितले.
या नियुक्तीच्या निर्णयात माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खंडूरी यांच्या सल्ल्याचाही संदर्भ रावत यांनी दिला. खंडूरी हे स्वतः दोन वेळा भेटण्यासाठी आले होते, असे त्यांनी नमूद केले. भविष्यात एखादी व्यक्ती कोणती चूक करेल, याचा अंदाज आधीच बांधता येत नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही रावत यांनी भाष्य केले. निवडणुकीची तारीख कधी जाहीर होणार, असा प्रश्न कोणी विचारला की आपण गंमतीने 'सीबीआय माझ्या दारावर कधी दस्तक देईल, त्यावर निवडणुकीची वेळ ठरेल', असे सांगत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी मात्र त्यांच्या घराऐवजी त्यांच्या एका सहकाऱ्याच्या घरावर कारवाई करून वेगळे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रावत यांनी केला.
काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरोधात एकजुटीने लढत असताना त्यांच्या कोणत्याही कृतीमुळे पक्षाच्या या संघर्षाला कमकुवतपणा येऊ नये, असे रावत यांनी म्हटले. याच कारणामुळे त्यांनी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतील सदस्यपद तसेच काँग्रेस कार्यसमितीच्या स्थायी आमंत्रित सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.