Haryana Assembly Dissolved Sarkarnama
देश

Haryana Assembly : हरियाणा विधानसभा भंग; देशात भाजपमुळे पहिल्यांदाच असे घटनात्मक संकट...

Nayab Singh Saini Bandaru Dattatreya Assembly Election : नायब सिंह सैनी सरकारने दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांकडे विधानसभा भंग करण्याची शिफारस केली होती.

Rajanand More

Haryana Assembly Dissolved : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हरियाणाच्या राज्यपालांनी मोठा निर्णय घेतला. विधानसभेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच गुरूवारी विधानसभा भंग करण्यात आली. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार राहिले नसून नायब सिंह सैनी हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

नायब सिंह सैनी सरकारच्या कॅबिनेटची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे तशी शिफारस करण्यात आली. घटनात्मक संकट उभे ठाकल्याने राज्यपालांनी तातडीने गुरूवारी रात्री विधानसभा भंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

काय आहे घटनात्मक पेच?

हरियाणा विधानसभेचे अखेरचे अधिवेशन 13 मार्च रोजी बोलावण्यात आले होते. त्यावेळी सैनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या सहकारचे बहुमत विधानसभेत सिध्द केले. प्रत्येक विधिमंडळाचे अधिवेशन सहा महिन्यांत घेणे घटनेनुसार बंधनकारक असते. पण सैनी यांच्या सरकारने या काळात अधिवेशन घेतले नाही. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला.

घटनेनुसार अधिवेशन घेण्याचा गुरूवारी अखेरचा दिवस होता. पण काही दिवसांपूर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने अधिवेशन घेणे सरकारला शक्य नव्हते. परिणामी, घटनात्मक संकट उभे ठाकल्याने सैनी कॅबिनेटला विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करावी लागली.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच विधानसभा भंग करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच असा घटनात्मक पेच निर्माण झाला होता. सरकारचा कार्यकाळ तीन नोव्हेंबरपर्यंत होता. पण आता 52 दिवस आधीच विधानसभा भंग करावी लागली.

राज्यात यापूर्वीही तीन वेळा विधानसभा भंग करण्यात आली होती. पण त्यावेळी निवडणुका घेण्यासाठी असे करण्यात आले होते. यावेळी अधिवेशन न घेतल्याने ही वेळ आल्याने भाजप सरकारवर मोठी नामुष्की ओढवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT