Congress Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : काँग्रेसनं घेतली 'रिस्क'; लोकसभा जिंकली, पण राज्यसभेची ‘ती’ जागा जाणार?

Rajanand More

New Delhi : काँग्रेस नेते दीपेंदर हुडा यांनी हरियाणातील रोहतक लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना आता राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या जागेवर पुन्हा निवडणूक होईल. पण राज्यसभेची जागा पुन्हा निवडून आणताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

लोकसभेच्या एका जागेच्या बदल्यात काँग्रेसला राज्यसभेची एक जागा गमवावी लागू शकते, अशी चर्चा आहे. हरियाणा विधानसभेत सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. तसेच क्रॉस वोटिंगची भीतीही काँग्रेसला आहे. अपक्ष व दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाचे काही आमदारही भाजपला मदत करू शकतात.

संख्याबळाचा विचार केल्यास हुडा यांची राज्यसभेची जागा भाजपला जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. हुडा हे 2020 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ 2016 पर्यंत होता. हरियाणामध्ये सद्या भाजपची स्थिती मजबूत आहे.

जननायक पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काही महिन्यांपुर्वीच भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द केले आहे. त्यामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला पुन्हा विजय मिळवण्यासाठी आकड्यांची मोठी जुळवाजुळव करावी लागेल, हे स्पष्ट आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधीच राज्यसभेची निवडणूक होईल. काँग्रेसचे एक आमदार वरुण चौधरी अंबाला लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेचे संख्याबळ 87 पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 44 आहे.

जेजेपी पक्षाचे एकूण 10 आमदार आहेत. पण या पक्षातही गटबाजी आहे. दोन आमदारांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिला आहे. तर एका आमदाराने काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता. काँग्रेसकडे एकूण 29 आमदार आहेत. त्यामुळे विरोधकांचे संख्याबळ 32 आहे.

भाजपकडे 41 आमदार असून त्यांना जेजेपी आणि काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेची एक जागा मिळाली असली तरी राज्यसभेची जागा गमवावी लागणार असल्याचे दिसते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT