देश

सावरकरांना विसरलो तर देशाला भयंकर किंमत मोजावी लागेल - नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही विसरलो तर त्याची भयंकर किंमत देशालाच नव्हे तर जगाला मोजावी लागेल आणि भविष्यही अंधारलेले असेल असा इशारा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून नव्या पिढीपर्यंत समग्र सावरकर पोहोचवावेत अशी सूचनाही त्यांनी सावरकरप्रेमींना केली. 

सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी बोलताना गडकरी यांनी पाच हजार वर्षांत मशीद तोडणारा व तलवारीच्या बळावर जबरदस्तीने धर्मांतरे करणारा एकही हिंदू राजा झाला नाही असे सांगतानाच गडकरी यांनी सहिष्णू व उदारमतवादी भारतीय संस्कृती मुस्लिम संस्कृतीच्या नव्हे तर " फक्त आम्ही चांगले, बाकी सारे काफीर ' या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असेही सांगितले. सामाजिक सुधारणांचा आग्रह व जातीयतेच्या प्रथेचा नाश, याबाबतीत सावरकर घटनाकारांपेक्षा पुढे होते असेही मत गडकरींनी मांडले. 

या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप काल झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर फडके यांच्या स्नुषा चित्रा फडके, माजी राज्यपाल राम नाईक व ओ पी कोहली, रवींद्र साठे आदी उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा दिल्लीतील अशांत परिस्थितीमुळे संमेलनाला आले नाहीत व त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. सावरकरांना विसरलो तर आम्ही देशाचे तुकडे करणारी 1947 सारखी परिस्थिती पुन्हा अनुभवू असे सांगताना गडकरी यांनी "" ज्या देशात 51 टक्के मुसलमान असतात तेथे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या गोष्टी शिल्लक रहात नाहीत'' हे बाळासाहेब देवरस यांचे विधान उधृत केले. 

ते म्हणाले की धार्मिक कट्टरतावाद व दहशतवादाचे चटके अमेरिकेसह साऱ्या लोकशाही युरोपीय देशांना बसत आहेत. आता तेदेखील जी भूमिका घेत आहेत ती सावरकरांच्या इशाऱ्याशी जुळणारी आहे. छत्रपती शिवरायांनीही कोणत्याही धर्माच्या महिलेशी मातेसमान व्यवहार करावा व कोणत्याही धार्मिक स्थळाचा अपमान करू नये, अशा सूचना सैनिकांना दिल्या होत्या. सेक्‍युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे तर सर्वधर्मसमभाव असा असल्याचेही गडकरी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT