रांची : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे चारा घोटाळा (fodder scam) प्रकरणातील पाचव्या खटल्यातही दोषी आढळले आहेत. झारखंडच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात २१ फेब्रुवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. यापूर्वी चारा घोटाळ्यातील अन्य ४ प्रकरणांमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांना दोषी आढळले असून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.
चारा घोटाळ्याचे हे प्रकरण १९९६ सालचे म्हणजे जवळपास ३ दशकांपूर्वीचे आहे. सीबीआयने या प्रकरणात ६४ गुन्हे दाखल केले होते आणि यातील ६ खटल्यांमध्ये लालू यादव यांचे नाव होते. यातील ५ खटले बिहारच्या विभाजनानंतर झारखंडला हस्तांतरित करण्यात आले होते. यातील एका खटल्याची सुनावणी पटनामध्ये झाली. तर अन्य ४ प्रकरणांमध्ये झारखंड सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. त्यानंतर आज झारखंडमधील पाचव्या आणि शेवटच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होवून त्यात लालू प्रसाद यादव दोषी आढळले आहेत.
पाचव्या खटल्यात लालू यादव यांच्याशिवाय अन्य १७० जणांचे नाव होते. यातील ५५ जणांचे निधन झाले आहे. तर अन्य २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ७ जण सरकारी साक्षीदार बनले होते. तर ६ जण फरार आहेत. RC/47A/96 हा पाचवा खटला होता आणि हाच सर्वात मोठा आणि महत्वाचा खटला होता. यात तब्बल १३९ कोटी रुपये बेकायदेशीरपणे सरकारी तिजोरीतून काढल्याचा आणि त्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. डोरंडा ट्रेजरीमधून १९९०-१९९१ आणि १९९५-९६ या काळात हा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चारा, औषधं, कृषी विभागाची उपरकरणं यांची खरेदी करण्याचे सांगत हे पैसे काढण्यात आले होते.
मे २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या अपिलावर लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातील चारा घोटाळ्याच्या प्रत्येक प्रकरणाची वेगवेगळी सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत सांगितले होते की प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी सुनावणी व्हावी. यातीलच ४ प्रकरणांमध्ये ते दोषी सापडले आहेत. तर आता पाचव्या प्रकरणात देखील त्यांना शिक्षा होणार आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांचा न्यायालयातील मुक्काम वाढणार हे नक्की आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.