Loksabha
Loksabha Sarkarnama
देश

महत्त्वाच्या व्यक्तिगत डाटा सुरक्षिततासह, हिवाळी अधिवेशनात येणार तब्बल ३० विधयके!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : आगामी गुजरात विधानसभा, दिल्ली मनपा निवडणुका पार पडल्यानंतर ७ डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर या दोन्ही निवडणुकीत जे काही निकाल हाती येतील त्याची पडसाद या अधिवेशनावर उमटण्याची शक्यता आहे. सरकारने १७ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात तब्बल ३० विधेयके चर्चा व मंजुरीसाठी आणली जाणार आहेत. यामध्ये सरकारच्या महत्वाकांक्षी व्यक्तिगत डाटा सुरक्षितता विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विधेयकांचाही समावेश आहे.

इलेक्ट्रिसिटी विधेयक, उच्च शिक्षणासंबंधिचे विधेयक, नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना, वन्यप्राणी संरक्षण यासह अनेक विधेयके मागील दोन अधिवेशनांपासून मंजुर होण्याची वाट प्रतिक्षेत आहेत. यापैकी काही विधेयके लोकसभेत मंजूर झाली, मात्र वरच्या गृहात म्हणजे राज्यसभेत अजूनही केंद्र सरकारकडे बहुमताचे संख्याबळ नसल्याने काँग्रेस व विरोधी पक्षांची भूमिका वरचढ ठरते.

अशा स्थितीत अधिवेशनादरम्यान केंद्रीय यंत्रणांची कारवाई, विरोधी नेत्यांवरील कारवाई, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषय विरोधक चर्चेला आणून किमान पहिला एक आठवडा गदारोळात पार पडण्याची शक्यता आहे. कोणतेही प्रमुख कामकाज न होता, पहिला आठवडा वाया जाण्याची मागील आठ वर्षांची अनुभव आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची औपचारिक घोषणा संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटद्वारे नुकतीच केली. ७ डिसेंबरपासून सुरू होणारे हे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या परवानगीनंतर लोकसभा आणि राज्यसभेने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्यावर जोशी यांनी या तारखा घोषित केल्या आहेत. संसदेचा आठवडा पाच दिवसांचाच असतो. त्यामुळे या काळात १७ बैठका होतील.

लोकसभा सचिवालयाच्या निवेदनानुसार, १७ व्या लोकसभेचे १० वे अधिवेशन असेल. स्वातंत्र्याच्या अमृतकालात अधिवेशन काळात विधिमंडळाच्या कामकाजासह इतर विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची मला आशा आहे अशी आशा जोशी यांनी व्यक्त केली. या अधिवेशनात फलदायी चर्चेची आपण वाट पाहत आहोत असेही जोशी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

दरम्यान संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम वर्षअखेरपर्यंत रखडण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन संसदेच्या सध्याच्या वर्तुळाकार इमारतीतच होण्याची शक्यता असल्याचे वृत्त सकाळ ने यापूर्वीच दिले आहे. नवीन त्रिकोणाकार संसद भवनातील अंतर्गत सजावट, वीजजोडणी, केबल टाकणे आदी सारी कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र 2022 चे हिवाळी अधिवेशन नव्या संसदेतच घेणार, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्धाराची पूर्तता करण्यासाठी एखाद्या दिवसाची प्रतिकात्मक बैठक नवीन संसद भवनात घेतली जाऊ शकते. याला `साॅप्ट ओपनिंग सेरोमनी` असेही म्हटले जाते.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे नवे सभापती जगदीप धनखड ५ किंवा ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठका बोलावतील. यासोबतच अधिवेशनातील सरकारी कामकाजाला अंतिम रूप देण्यासाठी सरकारही सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT