New Delhi News : इंडिया आघाडीतील नेत्यांकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेत नियम सोडून राजकारण जास्त होत आहे. ज्येष्ठ नेत्यांची हेडमास्तरप्रमाणे शाळा घेतात, संसद नव्हे तर सर्कस चालवतात, असे आरोप नेत्यांनी केले आहेत.
आघाडीने धनखड यांच्याविरोधात मंगळवारी राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यावरून बुधवारी राज्यसभेत भाजपच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या प्रस्तावाबाबत आघाडीने बुधवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फौजिया खान यांच्यासह आप तृणमूल काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी आदी पक्षांचे नेते उपस्थित होते. मागील तीन वर्षांत धनखड यांचे आचरण त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेच्या विपरित राहिले आहे. कधी ते सरकारचे कौतुक करतात, कधी स्वत: आरएसएसचे एकलव्य असल्याचे सांगतात. ही विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत, अशी टीका खर्गेंनी केली.
सभागृहात धनखड विरोधी पक्षातील नेत्यांकडे आपलेच विरोधक म्हणून पाहतात. वरिष्ठ, कनिष्ठ कुणी असो, दोन्ही सभागृहातील सदस्यांवर आपत्तीजनक विधाने करून त्यांना अपमानित करतात. विविध क्षेत्रात काम केलेले अनेक सदस्य या सभागृहात आहेत. 40-50 वर्षांचा अनुभव असलेल्या नेत्यांसोबतही हेडमास्तरांप्रमाणे शाळा घेतात. त्यांना प्रवचन ऐकवतात, असे आरोप खर्गेंनी केले.
धनखड यांची निष्ठा सत्ताधारी पक्षासाठी असल्याचे सांगत धनखड म्हणाले, प्रमोशनसाठी सरकारचे प्रवक्ते बनून काम करत असल्याचे दिसते. सभागृहात व्यत्यय येत असेल तर त्यामागचे सर्वात मोठे कारण सभापती स्वत: आहेत. सभापती हेच विरोधकांसाठी संरक्षण असतात. पण जर सभापती सत्ताधारी पक्षाचे गुणगाण करत असतील तर विरोधकांनी कुणाकडे पाहायचे. कुंपणच शेत खात असल्याची स्थिती आहे.
विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले तर तेच सरकारची ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या वागण्यामुळे देशाच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती आल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. त्यांच्या विरोधात आमची वैयक्तिक किंवा राजकीय वैर नाही. आम्ही खूप विचार करून लोकशाही वाचवण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने हे पाऊल उचलले असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. मी जवळपास 22 वर्षांपासून सभागृहात असून चार सभापतींना पाहिले आहे. पण आजच्या सारखी स्थिती यापूर्वी कधी पाहिली नाही. सभापती त्याचा आनंद घेत आहेत. ते संसद नव्हे सर्कस चालवत आहेत. अशाप्रकारे संसद चालणार असेल तर देशात संविधान आणि लोकशाही राहणार नाही. सभापतीच गोंधळ घालण्यासाठी उकसवतात आणि आम्हाला हतबल होऊन पाहावे लागते. त्यामुळे आमच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.