INDIA Alliance Sarkarnama
देश

Lok Sabha Election : आमचं ठरलं! निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; खर्गेंची मोठी घोषणा

Sachin Fulpagare

India Alliance Meeting Delhi : नवी दिल्लीत आज 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला 28 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, डाव्या पक्षाचे नेते डी. राजा असे बडे नेते इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत उपस्थित होते, असे खर्गे म्हणाले.

बैठकीत उपस्थित असलेल्या 28 पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. यानंतर 2-3 तास आम्ही चर्चा केली आणि पुढील रणनीतीवर सहमती दर्शवली. संसदेतील 141 खासदारांचे निलंबन झाले आहे. त्यावरही चर्चा झाली. याचा आम्ही निषेध केला. हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे, असे खर्गेंनी सांगितले.

'PM मोदी वाराणसीत, पण संसदेत येईना'

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, एवढीच आमची मागणी आहे. पण सरकार सहमत नाही. पंतप्रधानांनी या घटनेवर निवेदन द्यावे. पण पंतप्रधान दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. संसदेचे कामकाज सुरू असताना पंतप्रधान अहमदाबादमध्ये जातात. जाहीर सभा घेतात. पण ते संसदेत येत नाहीत. देशात यापूर्वी असे कधीच झाले नाही. त्यांनी 141 खासदारांना निलंबित केले आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका खर्गेंनी केली. भाजपा सरकार ज्या प्रकारे संसदेचे कामकाज चालवत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान तर वाराणसी फिरत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण असेल विरोधी पक्षांचा नेता?

पंतप्रधान कोण असेल? या बाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर घेतला जाईल. आम्ही आधी निवडणूक जिंकण्यावर भर दिला आहे. सत्ता मिळाल्यानंतरच आम्ही पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेऊ, असे खर्गेंनी स्पष्ट केले.

आघाडीतील जागावाटप कसे होणार?

INDIA आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय हा राज्य स्तरावर होईल. हा फॉर्म्युला कामी न आल्यास आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊ. दिल्ली आणि पंजाबबाबत काय करायचे? याचा विचार नंतर केला जाईल. इतर राज्यांच्या जागावाटपानंतर दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटप ठरवले जाईल. तसेच येत्या 30 जानेवारीपासून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 2024 INDIA आघाडीचा संयुक्त प्रचार सुरू होईल, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT