India Alliance Rajya Sabha win : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने दणदणीत विजय मिळाला आहे. आघाडीतील नॅशनल कॉन्फरन्सचे तीनही उमेदवारांनी विजय मिळवत भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. विधानसभेतील 88 पैकी 85 आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेत इंडिया आघाडीची सत्ता आहे. आता राज्यसभेतही आघाडीचे संख्याबळ तीनने वाढले आहे. एनसीने आपले चार तर भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते.
निवडणुकीत कॉन्फरन्सच्या चौधरी मोहम्मद रजवान यांनी भाजपचे उमेदवार अली मोहम्मद मीर यांचा पराभव केला. चौधरी यांना 58 तर मीर यांना 28 मते मिळाली. कॉन्फरन्सचे रजाद किचलू यांनी दुसरी जागा जिंकली. त्यांना 57 मते मिळाली. किचलू यांनी भाजपचे उमेदवार राकेश महाजन यांना पराभूत केले. कॉन्फरन्सचे तिसरे उमेदवार जी. एस. ओबेरॉय उर्फ शम्मी ओबेरॉय यांनाही विजय मिळाला. ते जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेत जाणारे पहिले शीख नेते ठरले आहेत.
या निवडणुकीत भाजपचे सतपाल शर्मा विजयी झाले आहेत. त्यांना 32 मते मिळाली. विशेष म्हणजे भाजपकडे केवळ 28 आमदार आहेत. त्यानंतरही शर्मा यांना 32 मते मिळाल्याने चार मते कोणत्या पक्षाची मिळाली, यावरून चर्चा सुरू झाली. इंडिया आघाडीतील आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चाही सुरू आहे.
विधानसभेत एनसीकडे 52, काँग्रेसचे सहा, पीडीपीचे 3 आणि अपक्ष 7 असे 68 आमदार सत्ताधाऱ्यांचे आहेत. त्यामुळे एनसीच्या दोन जागा सहजपणे निवडून येतील, हे स्पष्ट होते. पण पीडीपी, अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांनीही एनसीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने तिसरे सीटही निवडून आले.
भाजपने आमदारांचे संख्याबळ कमी असूनही तीन उमेदवार दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची भीती सत्ताधारी पक्षाला होती. संख्याबळ नसतानाही तीन उमेदवार देत भाजपने धडकी भरवली होती. पण निवडणुकीच्या निकालामध्ये आघाडी मजबूत आणि एकसंध राहिल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही पत्रकार परिषदेत त्यावर जोर दिला. हा विजय म्हणजे आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.