Beijing Olympic 2022
Beijing Olympic 2022  Sarkarnama
देश

मोठी बातमी : चीनमधील ऑलिंपिक स्पर्धेवर भारताचा बहिष्कार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीनच्या (China) सैन्यात गल्वान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आता चीनने पुन्हा भारताची खोडी काढली आहे. गल्वान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या अधिकाऱ्याला चीनने हिवाळी ऑलिंपिकचा (Olympics) 'टॉर्चबेअरर' बनवल्याचे समोर आले आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले असताना आता कठोर निर्णय घेत भारताने या स्पर्धेवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

चिनी सैन्यातील कमांडर दर्जाचा क्वि फाबाओ हा अधिकारी गल्वान खोऱ्यातील संघर्षात गंभीर जखमी झाला होता. चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक होत असून, यासाठी नेमकी याच अधिकाऱ्याची टॉर्चबेअरर म्हणून निवड करण्यात आली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शिनजियांग येथील सैन्य मुख्यालयात तो नियुक्तीस आहे. त्याने चारवेळा ऑलिंपिक चॅम्पियन असलेल्या वँग मेंग यांच्याकडून ऑलिंपिकची ज्योत स्वीकारली, असे वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे. यातून एकप्रकारे चीनने भारताच्या जखमेवर मीठ चोळल्याचे मानले जात आहे.

यावर भारत सरकार आता कठोर भूमिका घेतली आहे. हिवाळी ऑलिंपिकच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमावर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर करताना चीनवर ताशेरे ओढले आहेत.ऑलिंपिकसारख्या स्पर्धांच्या आडून चीन राजकारण करीत आहेत. हे अतिशय खेदजनक आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासातील अधिकारी ऑलिंपिकच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होत असलेल्या या ऑलिंपिकमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू सहभागी होत आहे. अरीफ मोहम्मद खान असे या खेळाडूचे नाव असून, तो स्कीअर आहे.

पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंकडून गोळीबार झालेला नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT