Vasundhara Raje Latest News sarkarnama
देश

भाजपमधील वाद पेटला; निवडणुकीच्या तोंडावर वसुंधराराजेंनी पक्षाला आणलं अडचणीत

Vasundhara Raje Latest News, राजस्थानमध्ये (Rajasthan) २०२३ च्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या राजस्थानात (Rajasthan) भाजपला अनुकूल वातावरण दिसत असले तरी पक्षांतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य भाजपवर (BJP) आजही पकड असलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व प्रदेशाध्यक्षांवर नाव न घेता प्रखर टीका करणे चालू ठेवले आहे. ज्यांना आपण राजकारणात आणले तेच आज 'वरून' पाठबळ मिळताच आपल्या विरोधात गेल्याचे सांगताना वसुंधरा यांनी "जिन पत्थरों को हमने दी थी धड़कने, उनको जुबान मिली तो हम पर ही बरस पड़े" असा अस्सल शायराना अंदाज वापरला. (Vasundhara Raje Latest News)

राजस्थानमध्ये २०२३ च्या अखेरीस विधानसभा निवडणूक आहे. भाजपची स्थिती राज्यात चांगली दिसत आहे. मात्र, वसुंधरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नकोत हा केंद्राचा आग्रह असल्याचे सांगितले जात असताना राज्य भाजपवर मात्र त्यांचाच प्रबाव कायम आहे, अशा परिस्थितीत भाजप सापडला आहे. भाजपध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी, जाहीर वक्तव्ये करू नका असे बजावले तरी वसुंधराराजे व त्यांचे विरोधक या दोघांवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसत नाही.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी वसुंधरा राजे यांच्या विरोधात दंड थोपटले असून अन्य एक मंत्री वसुंधरा यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेताना दिसतात. शेखावत व पुनिया यांनी वसुंधरा राजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे पाठ पिरवल्याने राजे गटाच्या ते निशाण्यावर आले आहेत. या दोघांनाही 'वरून' पाठबळ मिळाल्यानेच ते त्यांच्या एकेकाळच्या नेत्या असलेल्या वसुंधरा राजे यांच्याविरूध्द वक्तव्ये जाहीरपणे देत असल्याचा राजे गटाचा आरोप आहे. स्वतः वसुंधराराजेही याही माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी एका पुस्तक प्रकाशनात वरील शेर सागितल्यावर, आपण माघार घेणाऱ्यांपैकी नाही असे सांगून भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वालाच एकप्रकारे फेरआव्हान दिले.

त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविले नाही तर पक्षाला मोठे नुकसान होते व हातचा घासही जाऊ शकतो, असा इशारा राजे समर्थक वारंवार देत आहेत. मागील निवडणुकांत 'रानी तेरी खैर नही, मोदी तुझ से बैर नही' ही राजस्थानातील लोकभावना लक्षात घेतली तर आगामी निवडणुकाही मोदींच्याच चेहऱ्यावर लढवाव्यात असे पुनिया यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा की नसावा याचा निर्णय भाजप संसदीय मंडळ करेल असे पुनिया यांनी सांगताच माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, आमदार अशोक लाहोटी, कालीचरण सराफ, माजी मंत्री भवानीसिंह राजावत व इतर वसुंधरा समर्थकांनी, अशी छापील कारणे राजस्थानात देऊ नका, या अशा इशारा दिला.

वसुंधरा राजे यांनी राज्यात जनसंघ व भाजपला आधार देणारे माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांची आठवण सांगताना म्हटले की, ज्यांच्यासाठी तू फार काही केलेस तेच वेळ आली की एक दिवस तुला सोडतील, असे शेखावत आपल्याला नेहमी सागत. ते राजपूत होते व त्याचा त्यांना अभिमानही होता. मात्र, जातीयवादी कधीही नव्हते. शेखावत यांचा हात धरूनच आपण राजकारणात आलो. त्यांच्यामुळेच दोनदा मुख्यमंत्री झाले. आता माघार घेणार नाही कारण तसे करणे दिवंगत शेखावत यांच्या मार्गदर्शनाला शोभणारे नसेल असेही राजे कडाडल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT