ips officer param bir singh accuses anil deshmukh in mp mohan delkar case  
देश

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्री देशमुखांचा दबाव : परमबीरसिंग

मुंबईच्या आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनापत्र लिहून गृहमंत्र्यांच्या विरोधात लेटरबॉम्ब टाकला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी दबाव आणला होता, असा धक्कादायक दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट  आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे.  

दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा उल्लेखही परमबीरसिंगांनी पत्रात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोहन डेलकर हे 22 फेब्रुवारीला मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये मृतावस्थेत सापडले होते. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डेलकर यांची सुसाईड नोटही सापडली होती. त्यात काही नावांचा उल्लेख होता. मात्र, पहिल्या दिवसापासून गृहमंत्री हे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत होते. मात्र, आत्महत्या मुंबईत झाली असली तरी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दादरा-नगर हवेली पोलिसांच्या कार्यकक्षेत येतो, असे माझे मत होते. याबद्दल मी तुम्हालाही माहिती दिली होती. एवढे सगळे सांगूनही या प्रकरणी एसआयटीची स्थापना करुन एफआयआर दाखल केल्याची घोषणा केली. 

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT