jalaun district congress president anuj mishra clarifies about incident
jalaun district congress president anuj mishra clarifies about incident 
देश

मार खाल्लेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, मलाच हा राजकीय कट कळेना..!

वृत्तसंस्था

जालौन : येथील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन तरुणी भररस्त्यात चपलेने मारहाण करीत असल्याचा हा व्हिडीओ आहे. मिश्रा हे वारंवार छेड काढत असल्याने अखेर संतापून त्यांना मारहाण केल्याचे संबधित तरुणींनी म्हटले आहे. मिश्रा यांनी यामागे विरोधकांचा हात असल्याचा दावा केला आहे. 

उत्तर प्रदेशातील या घटनेची चर्चा आता देशभरात होऊ लागली आहे. जालौन जिल्ह्यातील उरई रेल्वे स्थानकासमोर ही घटना घडली आहे. तरुणींना कॉल करुन मिश्रा यांना बोलावून घेतले. ते तेथे आल्यानंतर त्यांना चपलेने मारहाण केली. या वेळी मिश्रा हे त्या तरुणींसमोर सोडून देण्यासाठी हात जोडून गयावया करीत होते. परंतु, त्यांनी मिश्रा यांना मारहाण सुरूच ठेवली होती.  या वेळी जमलेल्या बघ्यांपैकी कुणीतरी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे.  

या घटनेविषयी बोलताना अनुज मिश्रा म्हणाले की, मला कोणत्या राजकीय कटात अडकवण्यात येत आहे हे मलाच कळेना. दोन तरुणी अचानक येतात आणि माझी कॉलर पकडतात. त्यांच्यासोबत चार पुरुषही होते. त्यांनीच या प्रकाराचा व्हिडीओ बनवला. 

संबंधित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा मागील काही महिन्यांपासून कॉल करुन त्यांच्याशी अश्लील बोलत होते. ते अनेक दिवसांपासून आमचा लैंगिक छळ करीत होते. याची तक्रार आम्ही उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्याकडेही केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. 

आता या प्रकरणाची दखल पोलिसांनीही घेतली आहे. जालौनचे पोलीस अधीक्षक डॉ. यशवीरसिंह यांनी म्हटले आहे की, अनुज मिश्रा हे  लैंगिक छळ करीत असल्याने दोन तरुणींनी त्यांना उरई रेल्वे स्थानकासमोर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्याची पावले उचलण्यात येतील.   

काँग्रेसनेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती स्थापन केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल पक्ष नेतृत्वाला सादर करेल. या समितीत माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन, उत्तर प्रदेशचे काँग्रेस सरचिटणीस राहुल राय, महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा पाल, उत्तर प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष शिवनारायणसिंह आणि रंजन पांडेय यांचा समावेश आहे.  संबंधित तरुणींपैकी एक काँग्रेसची जिल्हा सरचिटणीस आहे. या घटनेनंतर तिला पदावरुन हटवण्यात आल्याचे समजते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT