Jammu and Kashmir Sarkarnama
देश

Jammu-Kashmir Election Results : मोदींचा ‘नवा काश्मीर’चा नारा, 370 ची जादू फेल; INDIA ने गाठले अर्धशतक

Rajanand More

Election Result Update : हरियाणामध्ये हॅट्ट्रिकच्या जवळ पोहचलेल्या भाजप जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘नवा काश्मीर’चा नारा फेल झाला आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून आघाडीचे 51 उमेदवार आघाडीवर आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभेची निवडणूक झाली. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत नवा काश्मीरचा नारा देत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. तर विरोधकांनी कलम 370 हटवल्याचा मुद्दा ऐरणीवर आणत भाजपविरोधी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

जम्मू आणि काश्मीरमधील मतदारांनी इंडिया आघाडीला साथ दिल्याचे चित्र निकालातून दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 11.30 वाजेपर्यंत राज्यात नॅशनल कॉन्फरन्सचे 41 तर काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर होते. या आघाडीला मतदारांनी डोक्यावर उचलून घेतल्याचे दिसते. भाजपचे उमेदवार केवळ 26 जागांवर आघाडीवर होते. यापैकी 25 मतदारसंघ जम्मूतील आहेत. काश्मीर व्हॅलीतील केवळ एका जागेवर भाजपला आघाडी मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आघाडीला एकूण 51 जागांवर आघाडी मिळाली असून अजूनही मतमोजणीच्या 8 ते 10 फेऱ्या बाकी आहेत. पण सध्याचे कल पाहता आघाडीच बाजी मारणार, हे निश्चित मानले जात आहे.

पीडीपी भूईसपाट

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष भूईसपाट झाला आहे. आतापर्यंत पक्षाचे केवळ तीन उमेदवार आघाडीवर आहेत. 2014 च्या निवडणुकीत हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण यावेळी मतदारांनी मुफ्तींना नाकारले आहे. विशेष म्हणजे मुफ्ती यांच्य कन्या इल्तिजा याही पराभवाच्या छायेत आहेत. त्यांनी ट्विट करत पक्षाचा पराभव मान्य केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT