Jharkhand Assembly Election Sarkarnama
देश

BJP Politics : सोरेन यांना पक्षात घेऊनही भाजप बॅकफुटवर; या कारणाने सत्ता न मिळण्याची भीती...

Rajanand More

Ranchi : पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री चम्पई सोरेन यांना पक्षात घेतले. पण त्यानंतरही भाजप जागावाटपात बॅकफूटवर आल्याचे दिसते. काही जागा मित्रपक्षांना अधिक सोडण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागणार आहे.

भाजपने एक पाऊल मागे घेण्याचे महत्वाचे कारणही समोर आले आहे. भाजपने यावेळी ऑल झारखंड स्टुडेंट्स यूनियन म्हणजे आजसू आणि संयुक्त जनता दल या पक्षांसोबत आघाडी केल्याचे जाहीर केले आहे. जागावाटपही अंतिम टप्प्यात असल्याचे आसामचे मुख्यमंत्री झारखंडचे भाजप प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

राज्यात आघाडीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरी त्या अपेक्षेपेक्षा कमी असतील, अशी चित्र आहे. आजसूला 6 ते 9 जागा देण्यासाठी भाजपने तयारी दर्शवल्याचे समजते. पण या पक्षाला 13 ते 15 जागा हव्या आहेत. त्यावर पक्षातील नेते अडून बसले आहे. या मागणीचा भाजपलाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यात भाजप 68 किंवा 69, आजसू 11 आणि जदयू एक किंवा दोन जागांवर निवडणूक लढवू शकते.

अद्याप हा फॉम्यूला अंतिम झालेला नाही. भाजपची मदार आजसूवर आहे. कारण मागील निवडणुकीत भाजप आणि आजसूमध्ये जागावाटपावरून फिस्कटले होते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आजसूने 52 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसला. सर्वाधिक फटका भाजपला सहन करावा लागला. भाजपला 28 तर आजसूला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.

2014 च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढली होती. या निवडणुकीत भाजपला 37 तर आजसूला पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत भाजप आजसूसोबत आघाडी करण्यात उत्सुक आहे. आजसूला कुर्मी मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ही मते राज्यात निर्णायक ठरतात. दुसरीकडे काँग्रेस आणि झाऱखंड मुक्ती मोर्चानेही कुर्मी समाजाकडे मोर्चा वळवला आहे.

भाजपला सत्ता मिळवण्यासाठी जेडीयूसह आजसूची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तीन-चार जागांसाठी भाजप आजसूसोबतची आघाडी तोडण्याची रिस्क घेणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. हेमंत सोरेन यांना पक्षात घेतले असले तरी इतर जातीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत. त्यामुळे भाजपला सध्यातरी बॅकफुटवर राहूनच निवडणुकीचा सामना खेळावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT