नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी पेट्रोल लिटरमागे 25 रुपयांनी स्वस्त करण्याची मोठी घोषणा केली आहे. पण यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी नवीन वर्षात 26 जानेवारीपासून पेट्रोल प्रतिलिटर 25 रुपये स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या नागरिकांना मोटारसायकल आणि स्कूटरसाठी हे स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.
पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजप आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.