IAS Pooja Singhal Latest Marathi News
IAS Pooja Singhal Latest Marathi News Sarkarnama
देश

IAS पूजा सिंघल कचाट्यात; ईडीकडून अटक अन् सेवेतूनही निलंबित

सरकारनामा ब्युरो

रांची : खाण घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि खाण, भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींचं घबाड समोर आलं आहे. (IAS Pooja Singhal Latest Marathi News)

अत्यंत प्रभावशाली आणि कर्तव्यदक्ष म्हणून सिंघल यांची ओळख होती. सिंघल यांच्यावर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण त्याकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. एका प्रकरणात झालेल्या तक्रारीनंतर ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांच्याकडे 19.31 कोटींची रोख रक्कम आढळून आली आहे. (ED arrested IAS Pooja Singhal)

ईडीने काही दिवसांपूर्वीच कुमार यांना अटक केली आहे. सुमन कुमार हे सिंघल यांच्याजवळचे मानले जातात. त्यांना अटक झाल्यानंतर ईडीने सिंघल यांची व त्यांची पतीही चौकशी सुरू केली होती. मंगळवार व बुधवारी अशी दोन दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनरेगा निधीसह अन्य प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिंघल यांच्यावर आहे. याप्रकरणी ईडीने नुकतीच रांची येथील पंचवटी रेसिडेन्सी, चांदणी चौक, कानके रोड, हरिओम टॉवर येथील नवीन इमारत, लालपूर, पल्स हॉस्पिटल, बरियातू येथील ब्लॉक क्रमांक 9 मध्ये ईडीने छापे टाकले होते.

कोण आहे पूजा सिंघल?

वयाच्या 21 व्या वर्षीच सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या आहेत. सिंघल यांची पहिली पोस्टिंग झारखंडमधील हजारीबागमध्ये झाली होती. त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारमध्ये त्यांचा दबदबा राहिला. प्रत्येक सरकारसोबत त्यांचे संबंध चांगले राहिले त्यांना हवे असलेले पद मिळत गेले. भाजपच्या रघुबर दास सरकारमध्ये त्या कृषी विभागाच्या सचिव होत्या. सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्याकडे अनेक प्रमुख पदं राहिली. हेमंत सोरेने यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खाण, उद्योग आणि जेएसएमडीसीचे अध्यक्षपदासह काही महत्वाची पदे देण्यात आली.

पूजा सिंघल यांचे पती अभिषेक हे उद्योजक असून त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आल्याचे समजते. आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजा सिंघलने अभिषेक यांच्यासोबत दूसरे लग्न केले. मनरेगा घोटाळ्याच्या एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने संपूर्ण प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील मनरेगामध्ये 18.06 कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा तेथे पूजा सिंघल उपायुक्तपदी होत्या अशी माहिती ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT