CM Hemant Soren, Kalpana Soren Sarkarnama
देश

BJP News : सोरेन यांना भाजप 'पळता भुई थोडी' करणार; प्लॅनिंग सुरू झालंय...

Rajanand More

Jharkhand News : झारखंडमध्ये लवकर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात ईडीकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात सोरेन अडकण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरू शकतात. पण सोरेन कुटुंबाला रोखण्यासाठी भाजपनेही रणनीती आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) आमदार सर्फराज अहमद यांनी आमदारकीचा (MLA) राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. सोरेन (CM Hemant Soren) हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पत्नीला मुख्यमंत्री करतील, अशी भविष्यवाणी भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनीच वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस झारखंडमधील राजकारण ढवळून निघणार आहे.

दुबे यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून झारखंडमधील राजकीय पेचावर भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच कल्पना सोरेन यांच्यासाठी पोटनिवडणूक लागल्यास त्याविरोधात भाजप न्यायालयातही धाव घेऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यांनी 2019 मध्ये काटोल पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार सहा महिन्यांच्या आत कल्पना सोरेन आमदार झाल्या नाहीत, तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकत नाहीत. काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता गांडेय या झारखंडमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ शकत नाही. त्यामुळे राज्यपालांनी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन झारखंडच्या लुटारूंना रोकावे, अशी विनंती दुबे यांनी राज्यपालांना केली आहे.

त्याआधीही त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करून सोरेन चिंतेत असल्याचे म्हटले होते. उद्या आमदारांची बैठक असून उद्या राज्यपालांना सोरेन यांचा राजीनामा आणि पक्षनेता म्हणून क्लपना सोरेन यांच्या नावाचे पत्र देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांना कायदेशीर सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. दुबे यांच्याकडून सातत्याने या मुद्यावर भूमिका मांडली जात असल्याने भाजपकडून सोरेन कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पुढील वर्षभरात विधानसभेची निवडणूक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT