Champai Soren, BJP Sarkarnama
देश

Champai Soren : ‘कोल्हान टायगर’ची डरकाळी; आघाडीचा ‘तो’ बालेकिल्ला भाजप उध्वस्त करणार

Rajanand More

New Delhi : झारखंडमध्ये ‘कोल्हान टायगर’ म्हणून प्रसिध्द असेलेले मातब्बर नेते व माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला संन्यास, मग दुसरा पक्ष स्थापन करण्याचा विचार अन् आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छत्रछायेखाली आसरा शोधला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर चंपई सोरेन यांनी मंगळवारी पहिल्यांदाच याबाबत जाहीर विधान केले. हा आपला नवा अध्याय असल्याचे सांगत ते म्हणाले, आधी विचार केला संन्यास घेऊ. नंतर जनतेच्या रेट्यामुळे राजकारणातच थांबण्याचा निर्णय घेतला. खूप विचारमंथन केल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत जायला हवे असे वाटले. मी आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

बालेकिल्ला उध्वस्त होणार

झारखंडमधील कोल्हान या आदीवासी भागात चंपई सोरेन यांची चांगलीच पकड आहे. हा भाग झारखंड मुक्ती मोर्चाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील विधानसभेच्या निवडणुकीत या भागातील 14 जागांपैकी जेएमएम यांना 11 तर आघाडीतील काँग्रेसला दोन जागा अशा एकूण 13 जागांवर विजय मिळाला होता. आतापर्यंतच्या निवडणुकीतील ही सर्वात चांगली कामगिरी ठरली होती.

झारखंडमध्ये आघाडीला सत्ता मिळण्यात कोल्हानचा मोठा वाटा असल्याने तो काबीज करण्याच्या उद्देशाने भाजपकडून चंपई सोरेन यांना पक्षात आणले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने निश्चितच भाजपची ताकद वाढणार असून आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे सोपे जाणार आहे.

‘जेएमएम’मध्ये पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन यांच्यानंतर चंपई सोरेन हेच सर्वात ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जेलमध्ये गेल्यानंतर चतेंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली. पण सोरेन बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. त्यामुळे अपमानित केल्याची भावना झाल्याने चंपई सोरेन यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT