Jyotiraditya Scindia and Smriti Irani
Jyotiraditya Scindia and Smriti Irani 
देश

स्मृती इराणी, जोतिरादित्य शिंदेंचं आधी सरकारमध्ये अन् आता पक्षात वाढलं वजन

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले होते. यात स्मृती इराणी (Smriti Irani) आणि जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता दोघांनाही भाजपने बढती दिली असून, त्यांचा समावेश भाजपच्या (BJP)राष्ट्रीय कार्यकारिणीत केला आहे.

स्मृती इराणी यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे असे महिला व बाल कल्याण खाते देण्यात आले. नंतर अतिशय महत्वाच्या राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना स्थान देण्यात आले. या समितीचे अध्यक्षपद खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आहे. इराणी यांच्याकडे आधी वस्त्रोद्योग खाते देऊन त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. आता त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाल्याने इराणींचे सरकारमधील वजन पुन्हा एकदा वाढल्याचे मानले जात आहे.

जोतिरादित्य शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे महत्वाच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. आता त्यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत बढती मिळाली आहे.

भाजपने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना स्थान देण्यात आले आहे. याचवेळी कार्यकारिणीमधून खासदार सुब्रह्मण्यम स्वामीना वगळण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला आहे. शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळले आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT