BJP Latest Marathi News
BJP Latest Marathi News Sarkarnama
देश

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पत्ता कट? प्रदेशाध्यक्षांनी दाखवलं हाय कमांडकडं बोट

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपमधील (BJP) मतभेद समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्य भाजपने एकमुखाने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस दिल्लीकडे केली होती. तरीही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या शिफारशीला केराची टोपली दाखवली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. (B. S. Yediyurappa News)

विजयेंद्र यांचे तिकीट कापण्यात आल्यानं भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. याआधी विधानसभा पोटनिवणुकांतही त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी हात झटकले. त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. ते म्हणाले की, विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस राज्य भाजपने एकमुखाने केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या डोक्यात काहीतरी वेगळं गणित असू शकते. विजयेंद्र यांना दुसरी संधी मिळू शकते.

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचे नाव नाही. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

विजयेंद्र यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण राज्याच्या कोअर समितीने त्यांचे नाव सुचवले होते. विजयेंद्र यांची उमेदवारी कापण्यात आल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. यानंतर विजयेंद्र यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. सत्ता आणि पदे ही राजकारणात कायमची नसतात, असे सूचक संदेश त्यांनी दिला आहे. येडियुरप्पा आणि माझ्या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांनी पक्षावर टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. पक्षासाठी योगदान देणाऱ्यांना पक्ष डावलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT